राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती बैठक, फडणवीसांची ऑनलाइन तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 09:53 AM2022-06-06T09:53:43+5:302022-06-06T09:54:15+5:30

Rajya Sabha election: महाविकास आघाडीने आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचे पाप केले आहे. ज्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही ते लोक लोकशाहीवर बोलत आहेत.

BJP's strategic meeting for Rajya Sabha elections, Union Minister Ashwini Vaishnav arrives in Mumbai | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती बैठक, फडणवीसांची ऑनलाइन तयारी

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती बैठक, फडणवीसांची ऑनलाइन तयारी

Next

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष उभा ठाकला आहे. दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या तयारीची बैठक रविवारी झाली. राज्यसभा निवडणुकीची पूर्वतयारी झाली असून, सर्व रणनीती, कार्यपद्धतीची ब्लू प्रिंट तयार असल्याचे भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले.

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भाजपने निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. रेल्वेमंत्री वैष्णव रविवारी मुंबईत दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात निवडणूक रणनीतीबाबत महत्त्वाची बैठक झाली. बैठकीला वैष्णव यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि राज्यसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार पीयुष गोयल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

भाजपचा तिसरा उमेदवार जिंकणार आणि शिवसेनेच्या संजयचा पराभव होणार, असे शेलार म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. याबद्दल विचारले असता, रोज सकाळी उठून बोलणाऱ्या संजय राऊत यांचे बोलणे हे पोरकटपणाचे आहे. त्यांना कदाचित स्व पक्षाचा पराभव दिसत असेल, त्यामुळे ते असे बोलत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. स्वत:चा आणि पक्षाचा पराभव दिसत असल्यानेच राऊत यांनी आतापासून कारणांची पेरणी करण्याचे काम चालू केले आहे. 

महाविकास आघाडीने आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचे पाप केले आहे. ज्यांचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही ते लोक लोकशाहीवर बोलत आहेत. राज्यात घोडेबाजार सुरू असल्याच्या राऊत यांच्या आरोपांचाही त्यांनी समाचार घेतला. राऊत तबेल्यात राहत असल्यामुळे त्यांना घोडेबाजार दिसत असावा, असे शेलार म्हणाले. 

फडणवीसांची ऑनलाइन तयारी
भाजपची बैठक देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर नियोजित होती. मात्र, त्यांना कोरोनाची लागण झाल्याने भाजप कार्यालयात बैठक घेण्यात आली. देवेंद्र फडणवीस ऑनलाइन पद्धतीने बैठकीला उपस्थित होते.

Web Title: BJP's strategic meeting for Rajya Sabha elections, Union Minister Ashwini Vaishnav arrives in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.