राज्यात भाजपची दुहेरी रणनीती; चार नव्या केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 09:42 AM2021-08-14T09:42:14+5:302021-08-14T09:43:22+5:30
भाजपच्या नव्या केंद्रीय मंत्र्यांची १६ पासून जनआशीर्वाद यात्रा
मुंबई: केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेते १६ ऑगस्टपासून राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्र सरकारचे चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवितानाच राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्र सोडणे, अशी या यात्रेची दुहेरी रणनीती असेल.
प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या यात्रेविषयी पत्र परिषदेत माहिती दिली. केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनआशीर्वाद यात्रेद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. या यात्रेचे प्रमुख समन्वयक आमदार संजय केळकर असतील.
कपिल पाटील यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ठाणे व रायगड जिल्ह्यात ५७० किलोमीटरची यात्रा काढतील. याच काळात डॉ. भारती पवार या नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ४३१ किलोमीटरची यात्रा काढतील. डॉ. भागवत कराड मराठवाड्यात ६२३ किलोमीटर यात्रा काढतील. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे प्रारंभाला सोबत असतील. नारायण राणे यांची यात्रा मुंबईतून १९ ऑगस्टला सुरू होईल. वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यात्रा २५ ऑगस्टपर्यंत ६५० किलोमीटरचा प्रवास करेल. या यात्रेत चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील. तसेच केंद्र सरकारी योजनांच्या लाभार्थींशीही संवाद साधतील.
भागवत कराड हे मराठवाड्यात ६२३ किलोमीटर यात्रा काढतील. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे प्रारंभाला सोबत असतील. नारायण राणे यांची यात्रा मुंबईतून १९ ऑगस्टला सुरू होईल.