एकनाथ शिंदेंच्या बंडाला भाजपाची ताकद?; व्हिडिओमधून झाला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 07:56 PM2022-06-23T19:56:19+5:302022-06-23T19:57:25+5:30
काही असेल तर आपण एकजुटीने पुढे जाऊ, विजय आपलाच आहे असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांना दिला.
मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडाने राज्यातील राजकारणात शिवसेनेला मोठा झटका बसला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पक्षातूनच आव्हान मिळालं. शिंदे यांच्या या पवित्र्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धोका निर्माण झाला आहे. या सर्व घडामोडीत भाजपाचा हात असल्याचा आरोप सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत आहे. त्याला आता एकनाथ शिंदे यांचाही अप्रत्यक्ष दुजोरा मिळाला आहे.
बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ माध्यमांमध्ये झळकला आहे. या व्हिडिओत बंडखोर आमदार एकमताने एकनाथ शिंदे यांना गटनेता बनवत असल्याचं घोषित करत आहेत. त्यानंतर शिंदे आमदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जे सुख-दुःख आहे, ते आपलं सगळ्यांचं एक आहे. काही असेल तर आपण एकजुटीने पुढे जाऊ, विजय आपलाच आहे. तुम्ही जे म्हणालात ते नॅशनल पार्टी आहे, महाशक्ती आहे, अख्ख्या पाकिस्तान काय परिस्थिती होती माहितीय असं त्यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडिओ समोर, आमदारांना केले मार्गदर्शन #EknathShindepic.twitter.com/jFrcus7vY4
— Lokmat (@lokmat) June 23, 2022
त्यानंतर नॅशनल पार्टी, महाशक्ती. त्यांनी मला सांगितलंय, तुम्ही जो हा निर्णय घेतला आहे, हा देशातला ऐतिहासिक निर्णय आहे. तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठेही काही लागलं तर कधीही कमी पडणार नाही, याची प्रचिती आपल्याला जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा येईल असं सांगत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाचा पाठिंबा असल्याचं सूतोवाच केले आहेत.
महाराष्ट्रातील राजकीय महाभारतामागे भाजपाचा हात - काँग्रेस
राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेला भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. ईडीची भिती दाखवून सरकार पाडण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे मात्र बहुमताचा आकडा आजही उद्धव ठाकरे यांच्याकडे असून महाविकास आघाडी सरकारला असलेला काँग्रेसचा पाठिंबा कायम आहे. राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला कसलाही धोका नसून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. बहुमताचे संख्याबळ अजूनही उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे सरकारला धोका नाही. शिवसेनेत जे काही चालले आहे ते लवकरच थांबेल. काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्र विकास आघाडीबरोबरच आहे असं विधान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
भाजपाचा हात दिसत नाही - अजित पवार
राज्यातील सत्तासंघर्षात सध्या तरी भाजपाच्या कुठलाही मोठा नेता यामागे दिसत नाही अशाप्रकारे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात भूवया उंचावल्या आहेत. त्यात आता खुद्द एकनाथ शिंदे यांचा व्हिडीओ समोर आल्याने राष्ट्रवादीचा दावा पोल ठरला आहे.