भाजपाचं संख्याबळ वाढलं, गीता गवळींचा पाठिंबा
By admin | Published: March 3, 2017 10:23 AM2017-03-03T10:23:40+5:302017-03-03T11:01:18+5:30
गीता गवळी यांनी गुरुवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - महापौरपदासाठी शिवसेना आणि भाजपाकडून संख्याबळाची सर्व गणितं आखली जात आहेत. जास्तीत जास्त अपक्ष नगरसेवकांना आपल्या गळाला लावण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून होत असताना अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी महापौरपदासाठी भाजपाला पाठिंबा दिला आहे. गीता गवळींच्या पाठिंब्यामुळे भाजपाचं संख्याबळ वाढलं असून महापौरपदावरील दावा बळकट झाला आहे.
गीता गवळी यांनी गुरुवारी रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चा झाल्याने गीता गवळी आता महापौरपदासाठी भाजपाला पाठिंबा देणार आहेत. गीता गवळी आज कोकण भवनात जाऊन गटनोंदणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. स्थायी समितीचं सदस्यपद आणि आरोग्य विभागाचं चेअरमनपद देण्याचं आश्वासन दिल्यानेच महापौरपदासाठी भाजपाला पाठिंबा देणार आहेत असं गीता गवळी यांनी सांगितलं आहे.
गीता गवळी शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता होती. गुरुवारी त्यांनी शिवसेना भवनात हजेरी लावल्याने त्या पाठिंबा जाहीर करतील असं सांगण्यात येत होतं. मात्र गीता गवळी आणि एकनाथ शिंदे, अनिल देसाई यांच्यातील बोलणी फिस्कटली ज्यामुळे कोणताच निर्णय न घेता गीता गवळी परतल्या. मुख्यमंत्र्यांच्या दबावामुळेच गीत गवळी माघारी फिरल्याचं सांगण्यात येत आहे.