भाजपाचा सर्जिकल स्ट्राइक

By admin | Published: January 7, 2017 03:45 AM2017-01-07T03:45:59+5:302017-01-07T03:45:59+5:30

भारतीय जनता पार्टीने आपल्या राज्य कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्याचा हेतू स्वबळाचा नारा देणे हाच आहे.

BJP's surgical strike | भाजपाचा सर्जिकल स्ट्राइक

भाजपाचा सर्जिकल स्ट्राइक

Next


ठाणे : भारतीय जनता पार्टीने आपल्या राज्य कार्यकारिणीची बैठक येथे आयोजित करण्याचा हेतू स्वबळाचा नारा देणे हाच आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिरून त्या पक्षाची राजकीय ताकद खच्ची करणे, हेच ध्येय भाजपाने निश्चित केले आहे, असे संकेत पक्षाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना रोज टीका करीत आहे. केंद्र सरकारचा घटक असतानाही मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यावर शिवसेना तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्यासोबत राष्ट्रपतींना भेटून विरोधी निवेदन देण्यास जाणार होती. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शिवसेनेला रोखले. केंद्रीय अर्थसंकल्प काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांकरिता पुढे ढकलण्याचा आग्रह विरोधी पक्षांनी धरला आहे. त्या सुरात शिवसेनेने सूर मिसळला आहे. अर्थसंकल्पाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाचा असून सत्तेत सहभागी शिवसेनेवर तो बंधनकारक असताना पक्षाने घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपाचे नेते कमालीचे नाराज झाले आहेत.
भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक शुक्रवारी दिल्लीत सुरू झाली. तत्पूर्वी राज्य कार्यकारिणी ठाण्यात घेण्याचा निर्णय जाहीर करण्यामागे आता शिवसेनेला मुंबई, ठाण्यात कोंडीत पकडणे, हा हेतू आहे.
राम कापसे यांच्याकडून ठाणे काढून घेतल्यापासून भाजपाने ठाण्याकडे लक्ष दिले नाही. गेली कित्येक वर्षे २५ टक्के जागाही भाजपाने लढवल्या नाहीत. या वेळी सर्व ताकद लढवून सर्व जागा लढवण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार आहे. शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यास त्या पक्षाचा मतदार एकवटून त्वेषाने बाहेर पडून मतदान करतो, या शक्यतेकडे लक्ष वेधले असता ‘लांडगा आला रे आला’ या गोष्टीप्रमाणे या वेळी शिवसेनेला लाभ होणार नाही, असा भाजपाचा होरा आहे. (प्रतिनिधी)
>प्रतिष्ठा पणाला लागेल ती शिवसेनेची
भाजपाच्या सूत्रांनी सांगितले की, या दोन्ही महापालिका निवडणुकीत शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारण, सत्ता त्यांची आहे. भाजपाच्या जेवढ्या जागा वाढतील, तेवढा आम्हाला फायदाच आहे. मुंबईत विधानसभा निवडणुकीत भाजपाची एक जागा शिवसेनेपेक्षा जास्त निवडून आली, तेव्हापासून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. भाजपाच्या स्वबळावर लढण्यामुळे शिवसेनेच्या जागा घटल्या व त्यांना युती करून सत्ता बनवणे अपरिहार्य झाले, तर शिवसेना अधिक परावलंबी होईल.

Web Title: BJP's surgical strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.