आठवडाभरात जाहीर होणार भाजपाच्या ३ याद्या
By admin | Published: January 25, 2017 09:51 PM2017-01-25T21:51:32+5:302017-01-25T21:51:32+5:30
आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी येत्या आठवड्याभरात जाहीर होणार आहे
Next
>
आठवडाभरात जाहीर होणार भाजपाच्या ३ याद्या
उमेदवारांमध्ये धाकधूक : काही प्रभागांतील नावांबाबत चर्चा सुरूच
नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी येत्या आठवड्याभरात जाहीर होणार आहे. सर्व प्रभागातील उमेदवारांची नावे एकदम जाहीर न करता २ ते ३ याद्या जाहीर करण्यात येणार आहेत. पहिली यादी रविवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. मुलाखत व सर्वेक्षणाच्या परीक्षेचा निकालच जाहीर होणार असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक वाढीस लागली आहे.
भाजपाकडे ३ हजारांहून अधिक इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज आले होते. यात प्रस्थापित नगरसेवकांसोबतच, पक्षाच्या शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश होता. ६ ते १४ जानेवारी या कालावधीत एकूण ३ हजार ३ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतींच्या ‘पॅनल’मध्ये विद्यमान खासदार, आमदार यांच्यासह माजी आमदार, शहर पदाधिकारी यांचा समावेश होता.
मुलाखती झाल्यानंतर आता उमेदवारांची यादी कधीपर्यंत जाहीर होते याकडे इच्छुकांच्या नजरा लागलेल्या आहेत. कार्यकर्त्यांमध्ये विविध कयास लावण्यात येत आहेत. शिवाय विविध चर्चांनादेखील उधाण आले आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा पक्षाकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणाला महत्त्व देण्यात येणार आहे. त्यामुळे काही प्रस्थापित नगरसेवकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत निवडणूक संचालन समितीच्या पदाधिकाºयांची ‘मॅरेथॉन’ चर्चा झाली. बहुतांश प्रभागातील उमेदवारांची यादे अंतिम झाली आहेत. मात्र काही प्रभागांमध्ये समितीने ३ ते ४ नावे वेगळी काढली आहेत. या नावासंदर्भात विविध पातळीवर चर्चा सुरू आहे.
२ तारखेपर्यंत आम्ही सर्व उमेदवारांची नावे घोषित करु. एकत्र नावे घोषित न करता २ ते ३ याद्या जाहीर करण्यात येतील. वरिष्ठ पातळीवर नावांबाबत चर्चा झालीच आहे. त्यामुळे फारसा संभ्रम नाहीच, असे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी स्पष्ट केले.
रासपबाबत अद्याप ‘वेट अॅन्ड वॉच’
राष्ट्रीय समाज पक्षातर्फे भाजपाकडे युतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. शहरातील १२ जागा ‘रासप’साठी सोडण्याचा प्रस्ताव ‘रासप’ने ठेवला आहे. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. सद्यस्थितीत भाजपाने रासपसंदर्भात ‘वेट अॅन्ड वॉच’ची भुमिका घेतलेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘रासप’साठी इतक्या जागा सोडणे भाजपाला शक्य होणार नाही. त्यामुळे ‘रासप’ कमी जागांवर लढण्यास तयार होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.