''भाजपाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदीही ओबीसी, फक्त त्यांनी त्याचं कधी भांडवल केलं नाही''
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 08:02 PM2019-12-07T20:02:04+5:302019-12-07T20:03:14+5:30
गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये ओबीसी नेते प्रचंड अस्वस्थ आहेत.
मुंबई- गेल्या काही दिवसांपासून भाजपामध्ये ओबीसी नेते प्रचंड अस्वस्थ आहेत. ओबीसी आणि बहुजन नेत्यांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. सध्या ओबीसी नेत्यांनीही भाजपा नेतृत्वावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे, त्याच पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी ओबीसींना खरंच डावललं जात आहे का, यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. खरं तर आमदारांची जात बघायची नसते. पण आमच्या 105 निवडून आलेल्या सदस्यांपैकी 35 मराठा समाजाचे आहेत. 37 ओबीसी समाजाचे आहेत. 18 एससी-एसटी समाजाचे आहेत. सात खुला प्रवर्गातील आहेत.
भाजपामध्ये पहिल्यापासून ओबीसी समाजाला सर्वाधिक प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. ओबीसी समाजालाही भाजपा हा आपला पक्ष वाटतो. भाजपाचे सर्वोच्च नेते आणि पंतप्रधान मोदीजी हे ओबीसी आहेत. ते कधी सांगत नाही, भांडवल करत नाही. हेसुद्धा लक्षात घ्यावं लागेल. कोणीही असं नसतं की ज्याची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. मी गेलो तरी पक्षाचं काही अडणार नाही. नेतृत्वानं माझ्यावर विश्वास ठेवला. मी त्यांचा आभारी आहे. पण नेतृत्वाकडे दुसरा पर्यायच नाही, असं मला बिलकुल वाटत नाही. पर्याय तयार करता येतो. पर्याय त्या ठिकाणी कोणीही असू शकतं, असंही फडणवीस म्हणाले आहेत.
मुंडे साहेबांना प्रकाश शेंडगेंनी किती त्रास दिला हे जगजाहीर आहे. इतके बोलले की चारचौघांत अपमानित केलं. मुंडे साहेबांनी हे स्वतः मला खासगीत सांगितलेलं आहे. ते नेते जर सांगत असतील भाजपाने काय करावं, तर त्यांना अधिकार नाही. आमचे नेते त्यांच्या मनातल्या गोष्टी पक्षात सांगतील. बेईमानी करून बाहेर जाणार नाही.
आमचे 'ते' 12 आमदार कुठेही जाणार नाहीत
तीन पक्ष एकत्र आल्यानंतर 12 आमदार कशाला भाजपामधून फुटून जातील, कोणावर विश्वास ठेवून जातील. ज्यांना सरकारचे मंत्री ठरवता येत नाही. त्यांच्या विश्वासावर हे आमदार फुटून जाणार नाहीत. हे सरकार किती दिवस चालेल हे कोणीही सांगू शकत नाही. हे अंतर्विरोधानं भरलेलं सरकार आहे. देशामध्ये असं सरकार कुठेही चाललं नाही. देशाच्या इतिहासात इतकं अंतर्विरोध असलेलं सरकार चालल्याचं मला दाखवा. राष्ट्रवादीवाले सोयीप्रमाणे कुठेही फिट होतात. त्यांना सोयीप्रमाणे कुठलीही भूमिका घेता येते. पण काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणं यापेक्षा दुर्दैवं काय असू शकतं.