भाजपाला हवाय सेनेचा बिनशर्त पाठिंबा
By admin | Published: October 23, 2014 04:34 AM2014-10-23T04:34:44+5:302014-10-23T04:34:44+5:30
महाराष्ट्राचे प्रभारी जे. पी. नड्डा यांना भेटण्याच्या इराद्याने दिल्लीत गेलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना नड्डा यांची भेट मिळालीच नाही.
संदीप प्रधान, मुंबई
शिवसेनेने महाराष्ट्रातील भाजपा सरकारला बिनशर्त पाठिंबा द्यावा याकरिता भाजपाने दबावतंत्राचा वापर सुरु केला. महाराष्ट्राचे प्रभारी जे. पी. नड्डा यांना भेटण्याच्या इराद्याने दिल्लीत गेलेल्या शिवसेनेच्या नेत्यांना नड्डा यांची भेट मिळालीच नाही. त्यामुळे मंत्रीपदांच्या मागणीचा शिवसेनेचा प्रस्ताव खिशात तसाच राहिला. आता सोमवारी याबाबत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन घेऊन सेनेचे नेते परतले आहेत.
सेनेचे सुभाष देसाई व अनिल देसाई हे मंगळवारी सायंकाळी दिल्लीत नड्डा यांच्या भेटीकरिता गेले होते. मात्र त्यांना केंद्रीय राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान व राज्य विधान परिषदेचे सदस्य चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून परतावे लागले. यापूर्वी सेनेने ओम माथूर यांच्याशी चर्चा करण्यास आदित्य ठाकरे यांना धाडले होते. त्याचाच वचपा भाजपाने काढल्याचे बोलले जाते. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाला सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाणार आहेत. सध्या भाजपाकडे अपक्ष आणि इतर लहान पक्षांचे मिळुन १३५ ते १३८ आमदारांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे एखाद्या विधेयकावर मतदान घेण्याची वेळ आलीच तर उपस्थित आमदारांमध्ये बहुमताला आवश्यक संख्याबळ भाजपाकडे असल्याने विधेयक किंवा विनियोजन विधेयक मंजूर करण्यात अडचण येणार नाही. शिवाय सरकारविरोधात एकदा अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्यावर सहा महिन्यांत आणता येत नाही. त्यामुळे अल्पमतामधील सरकार चालवण्यात भाजपाला अडथळा नाही.