भाजपाचे राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनैतिक संबंध, उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 11:24 AM2018-12-31T11:24:45+5:302018-12-31T11:26:55+5:30
अहमदनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने हिसकावून घेतल्याने शिवसेनेचा तीळपापड झाला आहे. दरम्यान, शिवसेना नेतृत्वाने आज सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
मुंबई - अहमदनगर महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास भाजपानेराष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने हिसकावून घेतला. त्यामुळे तीळपापड झालेल्या शिवसेना नेतृत्वाने आज सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर कठोर शब्दांत टीका केली आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील लफडे जुनेच आहे. आता नगरमध्ये ते पुन्हा उफाळून आले आणि भाजपला तेथे महापौर-उपमहापौरपदाची प्राप्ती झाली, असा घणाघात सामनामधून भाजपावर करण्यात आला आहे.
एकीकडे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होता कामा नये असे म्हणायचे आणि दुसरीकडे दुसर्या बाजूला राष्ट्रवादीशी अनैसर्गिक, अनैतिक संबंध ठेवून सत्ताभोग घ्यायचा. हे भाजपाचे धोरण आहे. त्यांची खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे हे राष्ट्रवादीशी संबंध ठेवून भाजपने सिद्ध केले आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुखांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे अहमदनगरमधील राजकीय घडामोडींबाबत आपल्याला माहिती नव्हती, असे म्हणत आहेत. मात्र शरद पवार यांना माहिती होती की नाही हे त्यांचे त्यांनाच माहीत. आता राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. मात्र हे सगळे ढोंग आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
धुळे, जळगावमध्ये पैशांचा खेळ, सत्तेच्या माध्यमातून दाबदबावा आणि तांत्रिक घोटाळ्याचा वापर करत भाजपाने सत्ता मिळवली. मात्र नगरमध्ये त्यांना असे घोटाळे करणे जमले नाही. कारण हवा शिवसेनेची होती. भाजप खासदारांचे पुत्रही त्यांच्या घरच्या मैदानात शिवसेनेकडून पराभूत झाले. मात्र नगरमध्ये सासरा भाजपात आणि जावई राष्ट्रवादीत असे चित्र आहे. हे दोघेही एकत्र आले. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी व भाजपचे लफडे नव्याने समोर आले, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुखांनी केली.