राजकीय सुडबुद्धीने सीबीआयचा भाजपाकडून वापर - अशोक चव्हाण
By admin | Published: January 28, 2016 02:53 PM2016-01-28T14:53:03+5:302016-01-28T14:53:03+5:30
भारतीय जनता पार्टीचं सरकार राजकीय सुडबुद्धीने सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - भारतीय जनता पार्टीचं सरकार राजकीय सुडबुद्धीने सीबीआयचा वापर करत असल्याचा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श घोटाळाप्रकरणी टांगती तलवार असून त्यांची चौकशी होणार असल्याचे भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
मुंबईतील मोक्याच्या जागेवर बांधलेल्या इमारतीतील शहीद सैनिकांसाठी असलेले फ्लॅट्स राजकीय नेत्यांनी, सरकारी अधिका-यांनी व अन्य बड्यांनी हडप केल्याचा आरोप असलेले आदर्श घोटाळा प्रकरण अनेक वर्षे गाजत आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांनाही आदर्शमध्ये फ्लॅट मिळाल्याचा आरोप झाला.
आदर्श घोटाळाप्रकरणी चव्हाण यांच्यावर ठपका ठेवण्यात आल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे, तसेच त्यांच्यावर खटला दाखल करण्यासाठी सीबीआयने राज्यपालांकडे अनुमती मागितल्याचेही सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे सरकार असताना राज्यपालांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या दबावाखाली सीबीआयला परवानगी नाकारली होती असा सोमय्या यांचा आरोप आहे.
या पार्श्वभूमीवर आदर्श घोटाळा चव्हाण यांची पुन्हा डोकेदुखी वाढवणारा ठरणार असल्याचे दिसत आहे.
मात्र, हे सगळे प्रकरण राजकीय सुडुबद्धीने होत असून त्यासाठी सीबीआयचा वापर केला जात आहे असा आरोप अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला.