नगरखेडा पंचायत समितीमध्ये भाजपाचा विजय, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 12:11 PM2021-10-06T12:11:58+5:302021-10-06T12:12:52+5:30
Maharashtra ZP, Panchayat Samiti Election Result Update: राज्याचे माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या नगरखेडा पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडी आणि अनिल देशमुख यांना धक्का बसला आहे. नगरखेडा पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात गेली आहे.
नागपूर - राज्यातील काही जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामध्ये काही अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांनी आघाडी घेतली आहे. मात्र राज्याचे माजी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांचे वर्चस्व असलेल्या नगरखेडा पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडी आणि अनिल देशमुख यांना धक्का बसला आहे. नगरखेडा पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात गेली आहे. (Maharashtra ZP, Panchayat Samiti Election Result Update)
नागपूरमधील नगरखेडा पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र आता ही पंचायत समिती भाजपाने हिसकावून घेतली आहे. अनिल देशमुख सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर असून, न्यायालयाने दिलासा न दिल्याने सध्या ते अज्ञातवासात आहेत. नागपूरमध्ये जिल्हा परिषदेच्या १६ जागांसाठी ७९ उमेदवार तर पंचायत समित्यांच्या ३१ जागांसाठी १२५ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदार संघातील सावरगाव व पारडसिंगा या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने गमावल्या आहेत. या दोन्ही जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे येथे गृह मंत्री अनिल देशमुख यांना मोठा धक्का बसला आहे. सावरगावमध्ये भाजपच्या पार्वती काळबांडे या 334 मतांनी विजयी झाल्या. तर पारडसिंगा येथे भाजपच्या मीनाक्षी संदीप सरोदे यांनी बाजी मारली.