भाजपाची 25 मे पासून शेतकरी संवाद यात्रा
By admin | Published: May 23, 2017 04:09 PM2017-05-23T16:09:54+5:302017-05-23T16:09:54+5:30
कोकणातील शेतकरी आणि मच्छीमार यांच्या हितासाठी भाजप शासनाने घेतलेले निर्णय तसेच सुरु केलेल्या नवीन योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सिंधुदुर्ग
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 23 - कोकणातील शेतकरी आणि मच्छीमार यांच्या हितासाठी भाजप शासनाने घेतलेले निर्णय तसेच सुरु केलेल्या नवीन योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्यावतीने 25 मे पासून शेतकरी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या संवाद यात्रेचा शुभारंभ वेंगुर्ले तालुक्यातील जैतीर येथील सुप्रसिध्द अशा शेतकऱ्यांच्या जत्रेचे निमित्त साधून जैतीर मंदिरापासून करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांनी दिली.
येथील भाजपा संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रभाकर सावंत उपस्थित होते.
यावेळी बोलताना अतुल काळसेकर म्हणाले, केंद्रातील भाजप शासन तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकालाला तिन वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमिवर पं. दिनदयाळ उपाध्याय कार्य विस्तार योजनेचा शुभारंभ 25 मे ते 10 जून या कालावधीत करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात 25 ते 28 मे या कालावधीत शेतकरी संवाद यात्रा काढण्यात येणार आहे.
विरोधी पक्षांप्रमाणे उन्हाची झळ न बसू देता, ए.सी. बसमधुन काढलेली अथवा जेवणावळी झोडणारी ही संवाद यात्रा नसेल. शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत तसेच मच्छीमारांच्या होड़ीपर्यन्त जाणारी ही संवाद यात्रा असेल. यावेळी शेतकरी तसेच मच्छीमार यांच्यांशी साधला जाणारा संवाद हा फक्त शासकीय योजनांची माहिती देण्यापुरता मर्यादित नसेल. तर त्यांच्या समस्या जाणून घेवून त्याबाबत तोडगा काढण्याच्या दृष्टिने केलेला प्रयत्न असेल.
शेतकरी , आंबा , नारळ ,सुपारी तसेच काजू उत्पादक, मच्छीमार यांच्याशी यावेळी संवाद साधण्यात येईल. 25 मे रोजी सकाळी 9 वाजता शेतकऱ्यांच्या अवजारांची जत्रा असलेल्या तुळस येथील जैतिर दर्शन घेऊन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संवाद यात्रेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तर दुपारी 12 वाजता वायंगणी- आडेली जिल्हा परिषद गटातील वेतोरे येथे पहिली शिवार सभा होणार आहे. दुपारी 2 वाजता मालवण चीवला बीचवर मच्छीमार आघाडी व वॉटर स्पोर्टस असोसिएशनच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण मच्छीमारांशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी ४ वाजता वैभववाडी येथील प्रमोद रावराणे यांच्या ऊसाच्या मळ्यात जिल्ह्यातील पहिली "जाहीर शिवार सभा" होईल.
या संवाद यात्रेच्या माध्यमातून जिल्ह्यातील आंबा, काजू, नारळ, सुपारी बागायतदार, सामान्य शेतकरी आणि मच्छीमारांच्या समस्या जाणून घेत राज्य शासनाच्या माध्यमातून उपाय योजना करण्यात येतील असेही काळसेकर यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, भाजपच्यावतीने "शिवार संवाद सभा अॅप" बनविण्यात आले असून त्याच्या माध्यमातून शेतकरी आणि मच्छीमारांच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. या समस्या निवारणासाठी मुख्यमंत्र्यानी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारला आहे. मच्छीमार आघाडीच्यावतीने रविकिरण तोरस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली रेडी ते विजयदुर्ग दरम्यान समुद्रकिनारी मच्छीमारांशी 25 मे रोजी संवाद साधण्यात येणार आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाच्या मच्छीमारांसाठीच्या योजनांबाबत माहिती देणारी पुस्तिका मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे.
आपल्यावर संपूर्ण कोकणसहित 10 जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर संवाद यात्रेसाठी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये कुडाळ - मालवण मतदार संघासाठी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व प्रभाकर सावंत, सावंतवाडी मतदार संघ आमदार अमित साटम व महेश सारंग तर कणकवली - देवगड मतदारसंघाची जबाबदारी आमदार अॅड. आशिष शेलार व प्रमोद रावराणे यांचा समावेश आहे. या कालावधित जिल्ह्यातील 110 सर्कलमध्ये कार्यविस्तारक योजना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात 110 पूर्णवेळ प्रचारकांसह नेते व प्रमुख कार्यकर्ते कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक पंचायत समिती आणि नगरपालिका क्षेत्रात राज्य शासनाच्या योजना पोचविण्यात येणार आहेत. 110 शिवार सभा घेण्यात येणार असल्याचेही काळसेकर यावेळी म्हणाले.
भाजप शासनाचे राणेकडून कौतुकच !
भाजप शासनाच्या योजना चांगल्या आहेत पण, त्या जनतेपर्यन्त पोहचत नाहीत. असे सांगत नारायण राणे यांनी भाजप शासन योजना राबवित असल्याचे कबूल करून एकप्रकारे शासनाचे कौतुकच केले आहे.तर त्यांचे आमदार असलेले सुपुत्र शासनाच्या योजना जनतेपर्यन्त पोहचविण्यासाठी शिबिरे आयोजित करुन शासनाला मदतच करीत आहेत. अशी मिश्किल टिपणीहि यावेळी केली.