उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मतविभागणीचा फायदा- शरद पवार
By admin | Published: March 12, 2017 09:08 AM2017-03-12T09:08:50+5:302017-03-12T09:08:50+5:30
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मतविभागणीचा फायदा झाला.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 12 - उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला मतविभागणीचा फायदा झाला. भाजपाविरोधात समाजवादी पक्ष व काँग्रेस, बहुजन समाज पक्ष आणि अजितसिंगांचा पक्ष वेगळे लढल्यानं साहजिकच त्याचा लाभ भाजपाला झाल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. भाजपा आणि पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे लक्ष्य केंद्रित केलं होतं. पंतप्रधानांनी एका राज्यात सत्ता आणण्यासाठी एवढे प्रयत्न केल्याचे पहिल्यांदाच पाहायला मिळाले. पाच राज्याच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवारांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार म्हणाले, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस, बहुजन समाज पक्ष व अजितसिंगांचा पक्ष हे भाजपाविरोधात निवडणूक लढवत होते. त्यामुळे साहजिकच मतविभागणीचा लाभ उत्तर प्रदेशात भाजपाला झाला. उत्तर प्रदेशमध्ये असा निकाल लागेल, हे अपेक्षित होते. तसेच भाजपाला आता उत्तर प्रदेशात स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांनी विकासाकडे अधिक लक्ष केंद्रित करावे, अशी तेथील लोकांची भाजपाकडून अपेक्षा असेल. मुंबई व अन्य ठिकाणी उत्तर भारतीयांचं होत असलेलं स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार निर्मिती करणे गरजेचे आहे. स्थलांतर रोखण्यासाठी तेथेच विकासात्मक कामे केली पाहिजेत.
पंजाबमध्ये अकाली दल-भाजपा गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत होते. लोकांनी यंदा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून काँग्रेसच्या हाती सत्ता सोपवली आहे. काँग्रेस या विजयाबद्दल अभिनंदनास पात्र आहे. पंजाब हे सीमेवरचे राज्य असल्यानं देशात अन्नधान्य पुरवठ्याच्या बाबतीत ते महत्त्वाची कामगिरी करते, तसेच सीमाही लागून असल्यानं त्याच्या रक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे राज्य आहे. पंजाबी लोकांच्या अपेक्षा काँग्रेसला पूर्ण कराव्या लागतील, असेही पवार म्हणाले आहेत.
मणिपूर आणि गोवा राज्यांतील अंतिम निकाल काँग्रेस आणि भाजपाच्या जवळपास समसमान आहेत. त्यामुळे त्यावर बोलता येणार नाही. परंतु गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री निवडणुकीत तेथे तळ ठोकून असताना काँग्रेसने मिळवलेला विजय हा डोळेझाक करण्यासारखा नाही, असे पवार म्हणाले. गोव्यात आणि उत्तराखंडमधल्या मुख्यमंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मणिपूरमध्ये भाजपा अजिबात नसताना भाजपने तेथे मिळवलेले यश अवर्णनीय असल्याचे पवार म्हणाले. उत्तराखंडचा विजय हा भाजपाला स्पष्ट बहुमत देणारा असल्याचे पवारांनी सांगितलं आहे.