पलूस-कडेगाव पोटनिवडुकीतून भाजपची माघार?, लवकरच निर्णय जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 02:36 PM2018-05-14T14:36:38+5:302018-05-14T14:36:38+5:30
पलूस-कडेगाव पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपनेही अर्ज भरला असला तरी, या निवडणुकीतून माघार घेण्याबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा सुरु असून लवकरच निर्णय जाहीर होणार आहे.
सांगली : पलूस-कडेगाव पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसतर्फे उभ्या असलेल्या विश्वजित कदम यांच्या विरोधात भाजपनेही अर्ज भरला असला तरी, या निवडणुकीतून माघार घेण्याबद्दल महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा सुरु असून लवकरच निर्णय जाहीर होणार आहे.
ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे पलूस-कडेगाव विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. रिक्त झालेल्या जागी काँगेसकडून यापूर्वीच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजित कदम यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना विरोध म्हणून भाजपनेही जिल्हा परिषदेचे विद्ममान अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा अर्ज दाखल करुन खळबळ उडवून दिली आहे.
या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने काँग्रेसला पाठींबा दिला आहे. भाजपनेही उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी, अशी विनंती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली होती. मात्र, आता भाजप घूमजाव करण्याच्या तयारीत असून उमेदवारी मागे घेण्याबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत कडेपूर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात चर्चा सुरु आहे.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह उमेदवारी अर्ज भरणारे संग्रामसिंह देशमुख यांची बंद दाराआड वीस मिनिटे चर्चा सुरु आहे. कोअर कमिटीची बैठक पुन्हा सुरू झाली असून चंद्रकांत पाटील आणि संग्रामसिंह देशमुख यांच्यासह पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे राजाराम गरूड आदी उपस्थित आहेत.