भाजपाचे ‘चला जिंकूूू या महाराष्ट्र’
By admin | Published: January 12, 2017 06:51 AM2017-01-12T06:51:46+5:302017-01-12T06:51:46+5:30
भाजपाकडून महापालिका निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चेचे निमंत्रण शिवसेनेकडे आज गेले
अजित मांडके / ठाणे
भाजपाकडून महापालिका निवडणुकीतील जागावाटपाच्या चर्चेचे निमंत्रण शिवसेनेकडे आज गेले असतानाच उद्या (गुरुवारी) ठाण्यात होणाऱ्या भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे घोषवाक्य ‘चला जिंकूया महाराष्ट्र’ हे आहे. त्यामुळे स्वबळावर महाराष्ट्रातील या मिनी-विधानसभेच्या निवडणुका जिंकण्याचा भाजपाचा इरादा पक्का असल्याचेच संकेत प्राप्त झाले आहेत.
ठाण्यासाठीचे घोषवाक्य हेही चला जिंकूया महानगरपालिका, हे आहे. शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी तीनतीन नेते जागावाटपाच्या वाटाघाटी करतील, असे मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार जाहीर करीत असताना पक्षाचे प्रवक्ते आ. राम कदम हे मुंबईत भाजपाची ताकद जास्त असून त्या तुलनेत भाजपाला जागा मिळाल्या पाहिजेत, असे सांगत होते. मुंबई, ठाणे या शिवसेनेचा वरचष्मा असलेल्या शहरांमधील नागरी सुविधांची वानवा, यावर प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत राम कदम व अन्य काही नेते बोट ठेवण्याची शक्यता आहे.
पुढील महिन्यात २१ तारखेला होणाऱ्या महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक तब्बल १० वर्षांनंतर ठाण्यात आयोजित केली आहे. ठाणे महापालिकेत सध्या भाजपाचे केवळ ८ नगरसेवक आहेत. परंतु, आता आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपाने स्वबळाचा नारा दिला आहे. कल्याण-डोंबिवलीत स्वबळावर लढल्यामुळे भाजपाला फायदा झाला. निवडणुकीपूर्वी ९ जागांवर असलेल्या भाजपाने ४२ जागांवर मजल मारली.
दरम्यान, सकाळी ९ वाजता प्रथम जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीतच युतीबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर, यासंदर्भातील प्रस्ताव प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. सकाळी ११ वाजता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीस ३५० हून अधिक निमंत्रित हजेरी लावणार आहेत. समारोपाचे सत्र हे सर्वांसाठी खुले असून मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने बैठकीचा समारोप होणार आहे. यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित असतील.
सर्व मंत्र्यांना मामलेदारची चमचमीत मिसळ
टिपटॉप येथे होणाऱ्या या बैठकीनिमित्त लज्जतदार जेवणावळी उठवण्यात येणार आहेत. जेवणात पंचपक्वान्नाचा थाट असून उपस्थित राहणाऱ्या मंत्र्यांना ठाणे शहर भाजपाकडून मामलेदारची चमचमीत मिसळ खाऊ घातली जाणार आहे.
या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतील काही दिग्गज पदाधिकारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.