बेळगावात काळ्या दिनी एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2016 04:56 AM2016-11-02T04:56:35+5:302016-11-02T04:56:35+5:30
बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी मंगळवारी बेळगाव शहर दणाणून गेले.
बेळगाव : बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी मंगळवारी बेळगाव शहर दणाणून गेले. एक नोव्हेंबर या काळ्यादिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मंगळवारी काढण्यात आलेल्या सायकल फेरीत पुन्हा एकदा मराठी अस्मितेचे दर्शन घडले.
संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात सामील केल्याच्या निषेधार्थ मराठी भाषिक १ नोव्हेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. या निमित्ताने कर्नाटक शासन ‘राज्य उत्सव दिवस,’ तर मराठी भाषक ‘सूतक दिन’ म्हणून पाळतात. गेली दोन वर्षे काळ्यादिनाच्या सायकल फेरीस दांडी मारणाऱ्या मराठी भाषिक महापौर, उपमहापौरांनी यावर्षी मात्र सायकल फेरीस हजेरी लावली. सकाळी नऊला संभाजी उद्यानातून सायकल फेरीस सुरुवात झाली. नंतर बेळगाव उत्तर भागातील काही भाग, शहापूर भागातून पुढे मराठा मंदिरात रॅली विसर्जित करण्यात आली.
बेळगावमध्ये काळ्यादिनानिमित्त काढण्यात आलेल्या सायकल फेरीच्या मार्गात ठिकठिकाणी कानडी आस्मितेचे लाल, पिवळे ध्वज लावल्याने अनेक ठिकाणी सायकल फेरी मार्गात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लाल, पिवळा ध्वज पाहून घोषणाबाजी करणाऱ्या मराठी युवकांवर बेळगाव पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.सोशल मीडियावरून जनजागृती आणि मराठा क्रांती मोर्चा यामुळे बेळगावातही ५० हजारांहून अधिक लोकांची झालेली गर्दी ऐतिहासिक ठरली. (प्रतिनिधी)