पोलिसांचा दबाव झुगारून सीमाभागात काळा दिन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 06:49 AM2020-11-02T06:49:25+5:302020-11-02T06:49:49+5:30
Black day : ...तरीही धरणे आंदोलन करत महाराष्ट्रात सामील होण्याचा वज्रनिर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषकांनी केला.
बेळगाव : पोलिसांचा दबाव झुगारत मराठी भाषकांनी सीमाभागात रविवारी काळा दिन पाळून कर्नाटक आणि केंद्र सरकारचा निषेध केला. बेळगावातील मराठा मंदिर या आंदोलनाच्या ठिकाणी जाता येऊ नये, यासाठी पोलिसांनी विविध भागांत नाकाबंदी, चौकशीसत्र आरंभले होते. तरीही धरणे आंदोलन करत महाराष्ट्रात सामील होण्याचा वज्रनिर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषकांनी केला.
या वेळी बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषकांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणाने उभे असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आंदोलन स्थळावर दिली. बेळगावसह सीमाभागातील काही गावे कर्नाटकात जोडल्याच्या निषेधार्थ प्रतिवर्षी १ नोव्हेंबर हा दिवस ‘काळा दिन’ म्हणून पाळला जातो.
कोरोनामुळे प्रतिवर्षी होणारी सायकल फेरी आणि जाहीर सभा रद्द करण्यात आली. मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन करण्यास प्रशासनाने सशर्त परवानगी दिली; पण ही परवानगी देताना आंदोलक स्थळापर्यंत पोहोचू नये यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन बंद पाडण्यासाठी जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना गोगटे पुलावर आणि चन्नमा सर्कल येथे रोखले. सीमा भागातील येळ्ळूर, कंग्राळी खुर्द यांसह अनेक गावांत कर्नाटक शासनाचा निषेध करण्यात आला.