स्मारक होणार ही काळ्या दगडावरची रेष

By admin | Published: December 24, 2016 04:59 AM2016-12-24T04:59:38+5:302016-12-24T07:01:58+5:30

शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने जनतेने १५ वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता होत आहे. महाराजांच्या स्मारकाकरिता

The black line on the monument to mark | स्मारक होणार ही काळ्या दगडावरची रेष

स्मारक होणार ही काळ्या दगडावरची रेष

Next

मुंबई : शिवस्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने जनतेने १५ वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्तता होत आहे. महाराजांच्या स्मारकाकरिता जुन्या सरकारच्या काळात परवानग्या मिळाल्या नाहीत ही दुर्दैवाची बाब आहे. आमच्या सरकारने या परवानग्या दिल्या. तरीही या कामात खोट काढणारे आहेत. स्वराज्याचा द्रोह करणारे लोक तेव्हाही होते त्यामुळे स्मारकाला होणाऱ्या विरोधाची काळजी नाही. शिवरायांचे स्मारक होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विरोधकांचा समाचार घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या जलपूजन व भूमिपूजन समारंभासाठी राज्यभरातून आणण्यात आलेल्या माती व नद्यांचे जलकलश स्वीकारण्याचा कार्यक्रम गेट वे आॅफ इंडिया येथे संपन्न झाला. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, महाराजांच्या स्मारकाच्या जलपूजन व भूमिपूजनासाठी आणण्यात आलेली माती व जल यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐक्य जपले जाणार आहे. शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्यांच्या आशीर्वादानेच महाराजांचा सेवक म्हणून सत्तेची सूत्रे हाती घेतली. महाराजांनी राजकारण आणि प्रशासन कसे असावे याचा परिपाक घालून दिलेला असून, या तत्त्वानुसारच रयतेच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू,असेही त्यांनी या वेळी सांगितले.
महाराजांनी आपल्याला अस्मिता आणि जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळेच आपण स्वदेश आणि स्वधर्म जिवंत ठेवू शकलो. जगभरातील लोक केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बघण्यासाठीच भारतात येतील असे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
राज्यातील सर्वच गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम राज्य शासनामार्फत सुरू असून, यासाठी संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सुरू आहे.
या समितीच्या मार्फत रायगडाचे काम सुरू असून, शिवनेरीच्या कामाला गती देण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याने या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ शनिवारी त्यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या समारंभासाठी तमाम शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
या वेळी राज्यभरातील ३६ जिल्ह्यांतून माती व नद्यांच्या जलाचे प्रत्येकी दोन याप्रमाणे ७२ कलश त्या त्या जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द केले. हे कलश मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पंतप्रधानांकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते स्मारकाच्या निश्चितस्थळी या कलशातील माती व पाण्याच्या साहाय्याने स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
‘शिवस्मारकाच्या जागी नौदल अकादमी उभारा’-
अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला नॅशनल फेडरल पार्टीने विरोध केला असून त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज नौदल अकादमी उभारावी, अशी मागणी पार्टीच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
नॅशनल फेडलर पार्टीच्या वतीने शुक्रवारी प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या परिषदेला पार्टीचे उमेदवार नियुक्ती समितीचे अध्यक्ष जगदीश माणेक यांनी अशी माहिती दिली. पवईच्या डोंगरावर शिवाजी महाराजांचे स्मारक बनविले पाहिज, असे ते म्हणाले.
कडेकोट बंदोबस्त
शिवस्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार असल्याने मुंबई पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सागरी, यलो गेट पोलीस ठाण्यांच्या पोलिसांसह भारतीय सागरी तटरक्षक दल आणि नौसेना यांनीही अरबी समुद्रात गस्ती वाढविल्या आहेत. स्थानिक पोलिसांसह शीघ्रकृती दल, एनएसजी कमांडो, फोर्सवन, राज्य राखीव बल, राज्य दहशतवाद विरोधी पथके, नौसेना तैनात ठेवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी,२४ डिसेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येत असून त्यांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे असेल, असे माहिती व जनसंपर्क खात्याकडून कळविण्यात आले आहे.
दुपारी १२ च्या सुमारास्९ा पनवेल येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ सिक्यूरिटीज् मॅनेजमेंटचे उद्घाटन.
दुपारी २.३० च्या सुमारास अरबी समुद्रातील स्मारकाचे जल व भूमिपूजन
दुपारी ३.३० च्या सुमारास बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर मेट्रो, उन्नत रेल्वेमार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन आणि त्यानंतर जाहीर सभा.
सभेनंतर पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पुण्याकडे रवाना.


शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनासाठी राज्यातील गडकिल्ले आणि शिवचरित्राशी संबंधित जिल्ह्यातून मातीचे कलश आणि सर्व नद्यांचे जलकलश शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. चेंबूर येथील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ढोल-ताशे, शिवकालीन वेशभूषेतील मावळे यांच्यासोबत चेंबूर ते गेट वे आॅफ इंडिया अशी कलशांची शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीही काढली.
महाराष्ट्रातील ३६ जिल्हातील नद्यांचे पाणी तसेच गडकिल्ल्यांच्या मातीचे ७२ कलश वाजतगाजत गेट वे आॅफ इंडियाकडे नेण्यात आले. हे कलश ठेवण्यासाठी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी खास रथ तयार केला होता. हे सर्व कलश या रथामध्ये ठेवण्यात आले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही मिरवणूक चेंबूरवरुन गेट आॅफ इंडियाच्या दिशेने रवाना झाली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांसह मोठ्या प्रमाणात सामान्य जनता देखील यात्रेत सहभागी झाली होती. रथाच्या पुढे लेझीम आणि ढोल पथक, रथाच्या मागे बाईक रॅली अशी ही मिरवणुक मोठ्या उत्साहात सायन, लालबाग, गिरगाव चौपाटी असा प्रवास करत गेट वे आॅफ इंडिया येथे दाखल झाली.
त्यानंतर गेट वे आॅफ इंडियावर उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर हे कलश नेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सन्मानपूर्वक हे सर्व कलश सुपुर्द करण्यात आले. २४ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री हे कलश पंतप्रधानांकडे सोपविणार आहेत. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते शिवस्मारकाचे भूमिपूजन होईल.
या सभारंभासाठी नितीन देसाई यांनी खास शिवकालीन वातावरण दाखविणारा व्यासपीठ उभारला. यावेळीमेघडंबरी आणि किल्ल्याचा देखावा साकारण्यात आला होता. या शोभायात्रेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, गृहराज्य मंत्री प्रकाश मेहता, सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, कला दिग्दर्शक नितीन देसाई आणि अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.

Web Title: The black line on the monument to mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.