रॉकेलच्या काळ्या बाजारास अभय

By admin | Published: January 11, 2017 06:37 AM2017-01-11T06:37:39+5:302017-01-11T06:37:39+5:30

सर्वसामान्य ग्राहकांच्या हक्काचे रॉकेल खुलेआम काळ्या बाजारात विकले जात आहे. दुकानदारांच्या मदतीने शेकडो लिटर रॉकेल रोज विकले जात असताना

Black market of kerosene | रॉकेलच्या काळ्या बाजारास अभय

रॉकेलच्या काळ्या बाजारास अभय

Next

नामदेव मोरे / नवी मुंबई
सर्वसामान्य ग्राहकांच्या हक्काचे रॉकेल खुलेआम काळ्या बाजारात विकले जात आहे. दुकानदारांच्या मदतीने शेकडो लिटर रॉकेल रोज विकले जात असताना, शिधावाटप कार्यालयाचे अधिकारी कारवाई करत नाहीत. यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही यामध्ये हात आहे का? याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
नवी मुंबईमधील १२ लाख लोकसंख्येसाठी वाशीमध्ये एकमेव शिधावाटप कार्यालय आहे. शहरामध्ये दिघा ते नेरूळपर्यंत झोपडपट्टी परिसरामध्ये अंत्योदय व इतर शिधापत्रिकाधारकांचे प्रमाण जास्त आहे. या सर्वांना रेशनवर प्रत्येक महिन्याला पाच लिटर रॉकेल मिळणे आवश्यक आहे; पण या नागरिकांच्या गरिबीचा व अशिक्षितपणाचा गैरफायदा घेऊन दुकानदार नागरिकांना कमी रॉकेल देत आहेत. अनेक नागरिकांना रॉकेलचे वितरणच केले जात नाही. याशिवाय बोगस शिधापत्रिकाही असण्याची शक्यता आहे. हे सर्व रॉकेल काळ्या बाजारात विकले जात आहे. रेशनवर रॉकेलची किंमत जवळपास १७ रुपये आहे; पण काळ्या बाजारात ७० रुपयांना विकले जात आहे. नेरूळ रेल्वे स्टेशन, दिघा, ऐरोली व इतर परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात रॉकेलची विक्री सुरू आहे.
शहरात सर्वाधिक रॉकेलचा काळा बाजार तुर्भेनाक्यावर सुरू आहे. येथे रॉकेलविक्रीचे १० ते १५ स्टॉल लावले जात आहेत. बिनधास्तपणे रोडवर रॉकेलविक्री केली जात आहे. शिधावाटप अधिकारी व कर्मचारी या परिसरात कामानिमित्त नियमितपणे येत असतात. नाक्यावर शिधावाटप दुकानेही असून, तेथेही तपासणीसाठी येत असतात. रहदारीच्या मार्गावरच रॉकेलविक्री सुरू असल्याचे सर्वांना दिसत असून, शिधावाटप अधिकारी व कर्मचाऱ्यांना ते दिसत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. काही कर्मचारी जाणीवपूर्वक अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे. या परिसरातील देशनिंग दुकानदार व या परिसराची जबाबदारी असणाऱ्या निरीक्षकांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांचे बिट मार्शल येथूनच जात असतात; पण कधीच रॉकेलविक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. यामुळे पोलिसांविषयीही नाराजी व्यक्त होत आहे. शहरात इतरही ठिकाणी रॉकेलचा काळाबाजार सुरू असून, त्यावर नियंत्रण कोण ठेवणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वाशी शिधावाटप विभागाचे अधिकारी संजय कोळी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी फोन उचलला नाही.

काळा बाजार करणारे रॅकेट
रॉकेलचा काळा बाजार करणारे मोठे रॅकेट नवी मुंबईमध्ये कार्यरत आहे. यामध्ये काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी, माजी पदाधिकारीही सहभागी आहेत. काळा बाजार करणारे बहुतांशजण स्वत: रॉकेलविक्री करत नाहीत. गरीब महिला किंवा इतरांना कमिशन देऊन रॉकेलविक्री करण्यास लावली जात आहे. मुख्य एजंट दुकानदारांकडून रॉकेल मिळवून ते या विक्रेत्यांना पुरविण्याचे काम करतात. याशिवाय पोलीस, शिधावाटप अधिकारी, स्थानिक राजकीय, सामाजिक कार्यकर्ते यांना मॅनेज करण्याचे काम करत आहेत. कारवाई झाली तरी ती फक्त विक्रेत्यांवर होते व मुख्य एजंट नामानिराळा
राहात आहे.

दुकानांचे परवाने रद्द करावे

रॉकेलच्या काळ्या बाजारामध्ये काही दुकानदार गुंतलेले आहेत. दुकानामधील रॉकेल परस्पर काळ्या बाजारात विकले जात आहे. संबंधित विक्रेत्यांना रॉकेल पुरविणाऱ्या दुकानदारांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी केली जात आहे. दुकानदारांवर ठोस कारवाई केली तरच हा प्रकार थांबेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

पोलिसांची बघ्याची भूमिका
तुर्भेनाक्यावर रोडवर १० ते १५ रॉकेलविक्रेते व्यवसाय करत असतात. पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसभर येथून ये - जा करत असतात; पण अवैध रॉकेलविक्रीवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सर्वांच्या समोर अवैध व्यवसाय सुरू असून कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.

Web Title: Black market of kerosene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.