दिवाळीत शेतकऱ्यांच्या काळ्या गुढ्या
By admin | Published: October 31, 2016 01:17 AM2016-10-31T01:17:27+5:302016-10-31T01:17:27+5:30
पुरंदर तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली बळजबरीने होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळास पारगावासह ७ गावांतील ऐन दिवाळीत शिमगा करून विरोध केला
राजेवाडी : पुरंदर तालुक्याच्या विकासाच्या नावाखाली बळजबरीने होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळास पारगावासह ७ गावांतील ऐन दिवाळीत शिमगा करून विरोध केला आहे. तसेच पाडव्याला शासनाच्या विरोधात ग्रामस्थांनी काळ्या गुढ्या उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
पारगाव राजेवाडी खानवडी एखतपूरसह पंचक्रोशीतील शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांची पारगाव येथे बैठक मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घेण्यात आली. यात राजेवाडी येथील शेतकरी माऊली बधे, वनपुरीचे महादेव कुंभारकर, पारगावचे सरपंच सर्जेराव मेमाणे, बापू मेमाणे, पोलीस पाटील रामभाऊ मेमाणे, खानवडीचे नितीन होले यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी विमानतळविरोधी भाषणे केली.
राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पारगाव येथील ७ गावांतील ग्रामस्थांची भूमिका विमानतळविरोधी असेल तर विमानतळ होणार नाही असे सांगितले होते. मात्र विजय शिवतारे व प्रशासन विमानतळ आमच्यावर लादत असल्याने याचा निषेध म्हणून उद्या दिवाळी पाडव्याला या सातही गावांतील ग्रामस्थांनी घरोघरी काळ्या गुढ्या उभारून विमानतळाचा विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.