डॉक्टरवर ब्लेडने वार
By Admin | Published: April 11, 2017 01:26 AM2017-04-11T01:26:56+5:302017-04-11T01:26:56+5:30
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना सुरक्षा पुरविली होती. मात्र सुरक्षा पुरवूनही डॉक्टर असुरक्षित असल्याचे चित्र मुंबईत आहे. डॉक्टर लक्ष देत
मुंबई : डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयांना सुरक्षा पुरविली होती. मात्र सुरक्षा पुरवूनही डॉक्टर असुरक्षित असल्याचे चित्र मुंबईत आहे. डॉक्टर लक्ष देत नाही म्हणून नशेखोर रुग्णाने सिझरिंग ब्लेडने डॉक्टरवर वार केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्री केईएम रुग्णालयात घडली. डॉ. तरुण चंद्रकांत शेट्टी (२६) या हल्ल्यात जखमी झाले आहेत. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी आरोपी रुग्ण सुनील सोमा भामळे (२२) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामळे हा शिवडीचा रहिवासी आहे. रविवारी दारूच्या नशेत मित्रांसोबत झालेल्या भांडणात तो जखमी झाला. त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी डॉ. शेट्टीने त्याची तपासणी केली. मात्र शेट्टी आपल्याकडे लक्ष देत नसल्याच्या रागात भामळेने ओपीडीतील सिझरिंग ब्लेडने त्याच्यावर वार केले. शेट्टी यांच्या सतर्कतेमुळे तो वार त्यांच्या हातावर लागला. यामध्ये त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालयात खळबळ उडाली.
अन्य डॉक्टरांसह सुरक्षारक्षकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. शेट्टींवर उपचार करत याबाबत भोईवाडा पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या भोईवाडा पोलिसांनी भामळेला अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. (प्रतिनिधी)
शासकीय यंत्रणांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे रुग्णालयात पूरक सुरक्षा यंत्रणा आहे. तसेच रुग्णालयाच्या संवेदनशील भागात अलार्म सिस्टीमही लावण्यात आली आहे. डॉ. तरुण शेट्टी यांच्यावर झालेला हल्ला हा केवळ रुग्णाने दारूच्या नशेत केला आहे. हल्ल्याविषयी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
- डॉ. अविनाश सुपे, केईएम, अधिष्ठाता