एकतर्फी प्रेमातून गोरेगाव येथे तरुणीवर ‘ब्लेडहल्ला’
By admin | Published: March 7, 2017 05:06 AM2017-03-07T05:06:00+5:302017-03-07T05:06:00+5:30
गोरेगावात एका १७ वर्षीय तरुणीवर ‘ब्लेडहल्ला’ झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला
गौरी टेंबकर-कलगुटकर,
मुंबई- गोरेगावात एका १७ वर्षीय तरुणीवर ‘ब्लेडहल्ला’ झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. एकतर्फी प्रेमाला नकार दिल्याच्या रागात हा हल्ला करणाऱ्या माथेफिरूला बांगूरनगर पोलिसांनी अटक केली आहे.
शंकर भारद्वाज (१९) असे अटक करण्यात आलेल्या माथेफिरूचे नाव आहे. जो गोरेगाव पश्चिम परिसरातील रहिवासी आहे. यातील पीडित मुलगी पिंकी (नावात बदल) हीदेखील याच परिसरात राहते. हे दोघे एकमेकांना ओळखतात. महाविद्यालयात शिकत असलेल्या या मुलीवर भारद्वाजचे एकतर्फी प्रेम होते. मात्र तिने त्याला नकार दिला होता. तरीदेखील तो सतत तिचा पाठलाग करायचा. मध्यंतरी त्याने पिंकीला एका तरुणासोबत बोलताना पाहिले आणि त्याने तिला जाब विचारला. तेव्हा तिने त्याला पुन्हा नकार दिला आणि त्या दोघांमध्ये भांडण झाले. तेव्हा याचा सूड घेण्याचे भारद्वाजने ठरविले. बांगूरनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पिंकी घरी परतत होती. तेव्हा भारद्वाजने तिला पुन्हा अडविले आणि प्रेमाबाबत विचारणा केली. तेव्हादेखील तिने त्याला थेट नाही असे सांगितले. ज्याचा भारद्वाजला प्रचंड राग आला आणि त्याने खिशातून धारदार ब्लेड काढत तिच्या चेहऱ्यावर सपासप वार केले. जखमी अवस्थेत तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली तेव्हा तो घटनास्थळाहून पसार झाला. स्थानिकांनी पिंकीला रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरने तिच्यावर उपचार केले.
पिंकीच्या चेहऱ्यावरील जखमा गंभीर नसल्या तरी चेहऱ्यावरील ब्लेडच्या जखमांचे डाग हे कायम चेहऱ्यावर राहतील, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भारद्वाजला बांगूरनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
>आरोपी शंकर भारद्वाज सतत तरुणीचा पाठलाग करायचा. रविवारी पिंकी घरी परतत असताना त्याने खिशातील ब्लेड काढून तिच्यावर वार केले.