सहायक निरीक्षकावर ठपका
By admin | Published: September 23, 2015 01:08 AM2015-09-23T01:08:08+5:302015-09-23T01:08:08+5:30
जालना येथील मुलीवरील (१७) सामुहिक बलात्कार प्रकरण हाताळताना वरिष्ठांना न कळवता निर्णय घेतल्याचा ठपका सहायक निरीक्षक (स्थानिक गुन्हा शाखा) विनोद इजापवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
डिप्पी वांकाणी, मुंबई
जालना येथील मुलीवरील (१७) सामुहिक बलात्कार प्रकरण हाताळताना वरिष्ठांना न कळवता निर्णय घेतल्याचा ठपका सहायक निरीक्षक (स्थानिक गुन्हा शाखा) विनोद इजापवार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
अतिशय संवेदनशील अशा या बलात्कार प्रकरणाची चौकशी करण्यास अतिरिक्त महासंचालक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यास सांगण्यात आले होते. या अधिकाऱ्याने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. या बलात्कार प्रकरणात आरोपींना पकडण्यासाठी इजापवारने या मुलीचाच वापर केला होता व त्यात तिच्यावर दुसऱ्यांदा याच आरोपींकडून बलात्कार झाला.
राज्याच्या पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार सहायक निरीक्षक विनोद इजापवारने एवढे संवेदनशील प्रकरण हाताळताना त्याची माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) आणि पोलीस अधीक्षकांना दिली नाही, असे या अहवालात म्हटले आहे. दोन वेळा इजापवारने अयशस्वी प्रयत्न केले होते व त्याची माहिती वरिष्ठांना दिली नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्याने आरोपीला पकडून आपल्याला काही शाबासकी मिळेल या आशेने संबंधित निरीक्षकालाही या कारवाईपासून दूर ठेवले, असे हा अहवाल म्हणतो.
६ जुलै रोजी या जालन्याच्या मुलीवर दोघांनी बलात्कार केला व त्याचे व्हिडिओचित्रण केले. ती मुलगी तेथे फेसबुकवरील तिच्या मित्राला भेटायला गेली होती. या दोन आरोपींनी तिचा मोबाईल फोन परत करण्यासाठी दोन हजार रुपये मागितले होते. ही मुलगी जेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली तेव्हा आरोपींना दुसऱ्यांदा भेटण्यासाठी तिचा वापर ७ जुलै रोजी इजापवारने केला परंतु त्यात त्याला यश आले नाही. ९ जुलै रोजी विनोद इजापवारने या पीडित मुलीचा वापर आरोपींना पकडण्यासाठी आमिष म्हणून केला. तथापि, आरोपींना पोलिसांनी पकडायच्या आधी या मुलीवर त्यांनी आणखी एकदा बलात्कार केला. पोलिसांनी नंतर नितीन साळवे (१९) आणि संजय हावरे (२१) यांना अटक केली.
बलात्कारासारखे संवेदनशील प्रकरण पोलीस किती बेपर्वाईने हाताळतात हे यामुळे समोर आले आहे. विधानसभेत विरोधकांनी या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडले. त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.अहवाल सरकारला सादर झाला असून त्याची योग्य ती दखल घेण्याचे काम त्यांचे आहे, असे हा अधिकारी म्हणाला. बलात्कारातील आरोपींना पकडून काही शाबासकी मिळविण्याचाच हा प्रकार आहे.