ब्ल्यू व्हेलचा वाढता विळखा...24 तासात दोघांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:59 PM2017-08-11T17:59:58+5:302017-08-11T18:07:30+5:30
ब्ल्यू व्हेल गेमच्या आहारी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांची 24 तासात सुटका करण्यात आली असून, त्यामधील एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई, दि. 11 - अंधेरीतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्यानंतर 'ब्ल्यू व्हेल' ऑनलाइन गेमचा मुद्दा चर्चेला आला असून विळखा वाढत चालला असल्याचं दिसत आहे. ब्ल्यू व्हेल गेमच्या आहारी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांची 24 तासात सुटका करण्यात आली असून, त्यामधील एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने दोघांनाही वाचवण्यात यश मिळालं आहे. मात्र यामुळे ब्ल्यू व्हेलचा धोका अजूनही कमी झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
मध्य प्रदेशातील शाळेत आत्महत्या करत होता विद्यार्थी
मध्य प्रदेशातील इंदुर शहरात एका विद्यार्थ्यानं ब्ल्यू व्हेल गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'ब्लू व्हेल'चा अंतिम म्हणजेच 50वा टप्पा पार करण्यासाठी या विद्यार्थ्यानं शाळा इमारतीच्या तिस-या मजल्यावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं यावेळी शिक्षकानं या मुलाला पाहिलं व लगेचच त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. यामुळे त्या मुलाचा जीव वाचू शकला.
राजेंद्र नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चमेली देव शाळेमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणा-या विद्यार्थी 'ब्लू व्हेल चॅलेंज'मधील 50वा टप्पा पूर्ण करण्यासाठी शाळा इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन उडी मारत होता. त्यानं उडी मारल्यास 2 कोटी रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सतर्क शिक्षकाने या मुलाचा 'ब्ल्यू व्हेल गेम'मुळे बळी जाण्यापासून बचावले आहे.
‘ब्ल्यू व्हेल गेम’च्या नादात घर सोडून पुण्याला
‘ब्ल्यू व्हेल गेम’चा टास्क पूर्ण करण्याच्या नादात सोलापूर येथील १४ वर्षीय किशोरवयीन मुलगा पुण्याच्या दिशेने जात होता. हे लक्षात येताच सोलापूर पोलिसांनी भिगवण पोलिसांना संपर्क साधून भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस एन. एम. राठोड यांनी तातडीने कार्यवाही केली. त्यामुळे भिगवण बसस्थानकात मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, असे असले तरी ‘ब्लू व्हेल’सारख्या जीवघेण्या मोबाईल गेमचे लोण आता ग्रामीण भागात पोहोचले आहे. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
अंधेरीतील मुलाचा ब्ल्यू व्हेलमुळे बळी
मुंबईमधील अंधेरी येथे राहणा-या 14 वर्षीय मुलाने ब्ल्यू व्हेल गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. या मुलाला ब्ल्यू व्हेल या ऑनलाइन गेमचे व्यसन जडले होते. रशिया आणि अन्य देशांमध्येही काही जणांना या गेमच्या नादात आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शेजारच्या इमारतीत राहणा-या लोकांनी या मुलाला इमारतीच्या गच्चीवर पाहिले होते. त्यावेळी तो स्वत:चा सेल्फी व्हिडीओ काढताना दिसत होता. अंधेरी पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे.
ब्ल्यू व्हेल, हा गेम नक्की आहे काय?
या गेममध्ये एकदा प्रवेश केला की खेळणारा मरेर्पयत काही त्यातून बाहेर पडू शकत नाही. हा ब्ल्यू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अॅडमिनिस्ट्रेटर. तो ऑर्डर देणारा व्यक्ती अज्ञात असतो, गेममधला अदृश्य कुणी. एकदा या खेळात लॉग इन केलं की तो वेगवेगळ्य़ा आज्ञा देतो. खेळायचं तर आज्ञा पालन करणं आलंच. साधारणत: 50 प्रकारच्या आज्ञांचे टप्पे मुलांना ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेनं होते. शेवटी खेळणार्याला आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं. काही शूरवीर आपलं जीवन खेळण्याच्या नादात संपवतातही! या गेममध्ये होतं काय की सुरुवातीला रात्री-अपरात्री उठणं, हॉरर सिनेमे एकटय़ानं पाहणे वगैरे टप्पे दिले जातात. नंतर मात्र स्वतःला इजा करुन घेणं, ब्लेडने कापून घेणं असे किळसवाणे आणि धोकादायक प्रकार करवून घेतले जातात.
सरते शेवटी चक्क आत्महत्या करण्याची ऑर्डर दिली जाते, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही मुलांनी हे टप्पे पार करुन आत्महत्या केल्याही. युलिया, कोन्स्टान्टिनोव्हा आणि व्हेरोनिका वोल्वोवा या दोन तरुण मुलींनी इमारतीवरुन उड्या मारल्यानंतर रशियन पोलीस एकदम सतर्क झाले. आपल्या देशात तरुणांच्या जीवाशी एक गेम खरंच खेळ करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मग ब्लू व्हेलचा तपास सुरु झाला आहे. आतार्पयत शंभराहून अधिक आत्महत्या या खेळामुळे झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
पालकांनो हे कराच -
मुले कोणता गेम खेळतात, याकडे लक्ष द्या.
त्यांच्याशी संवाद साधा, समजून घ्या.
मुला-मुलींना ओरडण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवा.
मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली कोणतीही गोष्ट करण्यापासून रोखा.
चांगले आणि वाईट काय, हे त्यांच्या वयाचे होऊन समजेल अशा भाषेत सांगा.
सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी मैदानी खेळ, एकत्रित सहल, गेट-टुगेदर अशा गोष्टी करा.