महालक्ष्मी स्टील फॅक्टरीत स्फोट; एक ठार, पाच जखमी

By Admin | Published: October 14, 2014 12:56 AM2014-10-14T00:56:48+5:302014-10-14T00:56:48+5:30

स्थानिक एमआयडीसीमधील महालक्ष्मी स्टील फॅक्टरीतील मेटल मेल्टींगच्या तप्त भट्टीत झालेल्या स्फोटात एक कामगार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. अन्य तिघे जखमी झाले.

Blast in Mahalaxmi steel plant; One killed, five injured | महालक्ष्मी स्टील फॅक्टरीत स्फोट; एक ठार, पाच जखमी

महालक्ष्मी स्टील फॅक्टरीत स्फोट; एक ठार, पाच जखमी

googlenewsNext

एमआयडीसी : फरनेस-२ सेक्शनमधील घटना
देवळी (वर्धा) : स्थानिक एमआयडीसीमधील महालक्ष्मी स्टील फॅक्टरीतील मेटल मेल्टींगच्या तप्त भट्टीत झालेल्या स्फोटात एक कामगार जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. अन्य तिघे जखमी झाले. प्लान्टच्या फरनेस-२ सेक्शनमध्ये सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमीला नागपूर येथे हलविण्यात आले असून त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळच्या पाळीत प्लान्टमध्ये १५ मीटर बाय २४ मीटर रूंदीच्या तप्त भट्टीत लोखंडी स्क्रॉब टाकून तप्त लोह रस तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटात भट्टीतील तापलेले लोखंडाचे तुकडे आणि लोह रस दूरवर उंच उडाल्यामुळे लिफ्ट तयार करणाऱ्या क्रेनवर काम करणारा कुशल कामगार शारदाप्रसाद शंभुप्रसाद दुबे (२६) रा. चेकपूर्वा जि. आंबेडकर नगर, उत्तर प्रदेश हा खाली असलेल्या ३३ के.व्ही. च्या विद्युत ट्रान्सफॉर्मरवर पडून जागीच ठार झाला. हा कामगार क्रेनच्या ७५ फूट उंचीवर काम करीत होता. ट्रान्सफॉर्मरमधील विद्युत करंट व भट्टीतून उडालेल्या तप्त लोह रसामुळे तो गंभीररीत्या भाजला गेला.
तसेच रामकुमार दरोगा यादव (३०) रा. ब्रह्मपुरा परसा जि. सारंग, बिहार हा कामगार तप्त भट्टीच्या स्फोटामुळे ६० टक्के भाजून गंभीर जखमी झाला. तसेच विश्वनाथ यादव रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश, उमेश मेहतो व इंद्रजीत राय दोघेही रा. छपरा बिहार हे सुद्धा जखमी झाले आहेत.
या फॅक्टरीमध्ये पुलगाव सीएडी कॅम्प मधील लोखंडी स्कॉबचा वापर करण्यात येतो. त्यामुळे या स्कॉबसोबत एखाद्या स्फोटक वस्तूचा तुकडा आल्यामुळे हा स्फोट झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा प्रकारचे अपघात या फॅक्टरीत नेहमीचेच झाले आहेत. मात्र त्यावर पडदा टाकण्याचे काम व्यवस्थापन करीत असल्याचा आरोप होत आहे.
तीन पाळ्यांमध्ये काम होत असलेल्या या फॅक्टरीत ९०० कुशल व अकुशल कामगार करतात असे कंपनीचे अध्यक्ष आर.एस. लढ्ढा यांनी सांगितले. कामगार अ‍ॅक्टच्या नियमांचे कुठेही पालन होत नसल्यामुळेच ही घटना घडली असावी, अशीही चर्चा आहे. यापूर्वीही या फॅक्टरीत अनेक कामगारांचा जीव गेला असल्याचा आरोप होत आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Blast in Mahalaxmi steel plant; One killed, five injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.