लोटेतल्या सुप्रिया केमिकल्समध्ये स्फोट; पाच जण भाजले, दोघे गंभीर
By admin | Published: October 25, 2016 11:10 PM2016-10-25T23:10:17+5:302016-10-26T00:15:55+5:30
सुप्रिया केमिकल्स या कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये सोल्व्हंट चार्ज करत असताना स्फोट झाल्याने पाच कामगार भाजले आहेत.
ऑनलाइन लोकमत
आवाशी, दि. 25 - खेड तालुक्यातील लोटे येथील सुप्रिया केमिकल्स या कंपनीच्या रिअॅक्टरमध्ये सोल्व्हंट चार्ज करत असताना स्फोट झाल्याने पाच कामगार भाजले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना ऐरोलीतील नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
सुप्रिया केमिकल्समधील रिअॅक्टरमध्ये मंगळवारी रात्री सोल्व्हंट चार्ज करण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी अचानक स्फोट झाला. या स्फोटामुळे तेथे काम करणारे पाच कामगार भाजले. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरातील ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी गोळा झाले. त्यामुळे वातावरणात काही काळ तणाव होता. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने हा तणाव निवळला. या दुर्घटनेत भाजलेल्यांपैकी विजय, प्रितेश यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ऐरोलीतील नॅशनल बर्न हॉस्पिटलकडे हलवण्यात आले आहे. किरकोळ जखमी झालेल्या तिघांना लोटेतील परशुराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
व्यवस्थापकाला घेराव
गंभीर जखमी झालेल्या दोघांना ऐरोलीकडे हलवण्यात आले. मात्र त्यांच्यासोबत कंपनीचा एकही माणूस गेला नाही. त्यामुळे कामगारांमध्ये संतापाची भावना होती. रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास कामगार तसेच ग्रामस्थांनी कंपनी व्यवस्थापकांना घेराव घातला. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.