झोळीचा झोका अन् जीवाला धोका : बालक मृत्यूमुखी
By admin | Published: February 22, 2017 09:18 PM2017-02-22T21:18:12+5:302017-02-22T21:18:12+5:30
झोळीच्या झोक्यातून उतरताना फास लागल्याने श्वास गुदमरून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना
नाशिक : झोळीच्या झोक्यातून उतरताना फास लागल्याने श्वास गुदमरून दोन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि़२२) सायंकाळच्या सुमारास सिडकोत घडली़
सिडकोमधील वरद मनोज लोखंडे (रा.गणेश चौक) असे मयत बालकाचे नाव आहे. या घटनेची अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास वरद हा घरातील झोळीमध्ये झोपलेला होता़ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तो झोपेतून जागा झाला आणि झोळीतून खाली उतरत असताना त्याच्या गळ्याला फास बसला व श्वास गुदमरला़ ही बाब लोखंडे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले़ मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल हलविण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरदला तपासून मयत घोषित केले़
घरात खेळणारा बागडणाऱ्या वरदच्या बाबतीत घडलेल्या घटनेने त्याच्या आईला मोठा धक्का बसला असून जिल्हा रुग्णालय आवारात त्यांचा विलाप सुरू होता़ या घटनेची माहिती मिळताच लोखंडे कुटुंबीयांचे नातेवाइकांनी रुग्णालयात गर्दी केली होती़ दरम्यान, या घटनेमुळे गणेश चौक परिसरात शोककळा पसरली आहे़