दुबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मखर ठाण्याचे
By admin | Published: August 22, 2016 03:57 AM2016-08-22T03:57:12+5:302016-08-22T03:57:12+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातील गणेशभक्तांकडून ठाण्याच्या मखरांना पसंती लाभत आहे.
प्रज्ञा म्हात्रे,
ठाणे- गेल्या अनेक वर्षांपासून परदेशातील गणेशभक्तांकडून ठाण्याच्या मखरांना पसंती लाभत आहे. नायजेरियापाठोपाठ यंदा दुबई येथे साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवात ठाण्यात तयार झालेल्या सहा फूट उंच मखरात बाप्पा विराजमान होणार आहेत.
ठाणेकरांनी पर्यावरणाचे भान राखत यंदाच्या गणेशोत्सवात इकोफ्रेण्डली मखरांना पसंती दिली असताना परदेशातील गणेशभक्तदेखील याच मखरांकडे वळले आहेत. दुबईबरोबरच सिंगापूर, आॅस्ट्रेलियामध्येही ठाण्याचे मखर पोहोचले आहे. आॅस्ट्रेलियातील गणेशभक्ताने घरगुती गणपतीसाठी मोदक मखर तर सिंगापूर येथील गणेशभक्ताने मंदिर मखर नेले आहे. त्याचप्रमाणे चेन्नई येथे वारली कुटी मखर नेण्यात आले आहे. नाशिक, पुणे व कोकणमधून ठाण्यातील इकोफ्रेण्डली मखरांना कायम पसंती लाभली आहे. परदेशातील गणेशभक्त घरगुती गणपतीसाठी एक ते दोन फुटांचे मखर घेऊन जात असल्याची माहिती मखर कलाकार कैलाश देसले यांनी ‘लोकमत’ला दिली. यंदाच्या इकोफ्रेण्डली मखरांमध्ये वारली पेटिंग्जने सजवण्यात आलेल्या मखरांचा प्रभाव दिसून येत आहे. या मखरांना ठाण्यातील गणेशभक्तांनी चांगलीच पसंती दिली आहे. आदिवासी संस्कृती मखराच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे देसले यांनी सांगितले. लाकडापासून बनवलेला दीपस्तंभ गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. इकोफ्रेण्डली मखरांमध्ये एक ते चार फुटांपर्यंतच्या मखरांचा समावेश असून मखर १०१ रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे.
>गतवर्षी गणेशमूर्तींबरोबर मखरांमध्येही ‘जय मल्हार’चा बोलबाला होता. यंदा गणेशमूर्तींमध्ये जय मल्हारची क्रेझ कमी झाली असली तरी मखरांमध्ये ‘जय मल्हार मखर’ला गणेशभक्तांची पसंती कायम आहे.