भुजबळ आहेत तेथेच खूश आहेत - संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 04:37 AM2019-09-05T04:37:21+5:302019-09-05T04:37:59+5:30
संजय राऊत : आर्थिक मंदीला भाजपच जबाबदार
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्वत:च ते जेथे आहेत तेथे खूष असल्याचे म्हटले आहे. पक्ष प्रवेशाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी स्वत:च जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या भावना व मतांचा आदर राखला जावा, असे स्पष्ट मत शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. मात्र भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करतील किंवा नाही याविषयी राऊत यांनी थेट भाष्य करणे टाळले आहे.
खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक भेटीवर आले असून, उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्तकेले. ते म्हणाले, देश आर्थिक कोंडीत सापडला असून, मंदीमुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन वर्षांपूर्वीच्या नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी लागू करण्याला शिवसेनेचा विरोध होता. त्यामुळे आता आलेल्या आर्थिक मंदीला भाजपच जबाबदार असल्याचे स्पष्ट मत शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. शिवसेना सत्तेत असली तरी, धोरणात्मक निर्णय घ्यायचा शिवसेनेला अधिकार नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी साडेतीन वर्षांपूर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाकीत केले होते. ते आता खरे वाटू लागले असून, आॅटोमोबाइल, टेक्सटाइल, फार्मास्युटिकल, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले आहे. रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे. त्यामुळे सरकारने परिस्थिती सावरण्यासाठी लवकर पावले उचलणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास सरकारने घेतलेले ३७० कलम रद्द करण्याचा तसेच राम मंदिरासारख्या प्रश्नांवरील निर्णयांना काही अर्थ राहणार नाही. या प्रश्नांपेक्षा लोकांना पोटाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो, अशी पृष्टीही त्यांनी जोडली. शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी, आमचा एकच मंत्री आहे. देशाची धोरणे पंतप्रधान, अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, मनुष्यबळ विकासमंत्री ठरवित असतात. त्यामुळे देशापुढे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीशी शिवसेनेचा संबंध नाही, त्यासाठी भाजपच जबाबदार असल्याचे खासदार राऊत म्हणाले.