अंध कर्मचा-याचे ‘डोळस’ काम
By admin | Published: October 15, 2014 01:20 AM2014-10-15T01:20:06+5:302014-10-15T01:20:06+5:30
‘असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ असे आपण सहजपणे म्हणतो. मात्र ज्यांच्या आयुष्यात जन्मापासून अंधार आहे त्यांनी काय करावे? याचा विचार करताच अंगावर शहारे येतात
ज्ञानेश दुधाडे, अहमदनगर
‘असेल दृष्टी, तर दिसेल सृष्टी’ असे आपण सहजपणे म्हणतो. मात्र ज्यांच्या आयुष्यात जन्मापासून अंधार आहे त्यांनी काय करावे? याचा विचार करताच अंगावर शहारे येतात. मात्र, समाजात असे काही अंध आहेत की त्यांचे काम डोळस लोकांनाही लाजवते. महेश भागवत जिल्हा परिषदेच्या सेवेत असून त्याचे काम अन्य कर्मचाऱ्यांना आदर्श ठरावे असे आहे.
शिक्षण, खासगी नोकरी असा प्रवास करीत महेश जिल्हा परिषदेच्या सेवेत आला. सुरुवातीला अंध आहे, ही सहानुभूती असणाऱ्या महेशने नंतर आपल्या कामाच्या जोरावर सहकाऱ्यांच्या मनात स्थान निर्माण केले. एमए, पहिल्या प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण, हिंदी पदविका परीक्षा, अंध माध्यमिक शिक्षकांची पदव्युत्तर राष्ट्रीय परीक्षा तो उत्तीर्ण आहे. टेलीफोन आॅपरेटरचा कोर्स, मराठी, हिंदी आणि इंग्रजी टायपिंग, संगणकाचे वर्ल्ड, एक्सएल, वेब ब्राऊनिंग, ई-मेल पाठविणे ते डाऊनलोड करण्याची कला त्याला अवगत आहे. त्यासाठी तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो.
४ वर्षे देहरे प्राथमिक आरोग्य केंद्र, ८ वर्षे बांधकाम विभागात शिपाई. त्यानंतर पदोन्नतीने हवालदार आणि त्यानंतर शिक्षण विभागात ज्युनिअर क्लार्क म्हणून काम करीत आहे. फोन घेणे, तालुकास्तरावर विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना सर्व माहिती, निरोप देणे, अहवाल मागवून घेण्याची त्याची जबाबदारी आहे. त्यांच्याशिवाय शिक्षण विभागातून कोणताच निरोप परस्पर तालुकास्तरावर पाठविला जात नाही.