रविवारी चारही मार्गांवर ब्लॉक
By admin | Published: April 22, 2017 02:54 AM2017-04-22T02:54:17+5:302017-04-22T02:54:17+5:30
यंदाच्या रविवारी गरज असेल, तरच प्रवास करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. २३ एप्रिल रोजी मध्य रेल्वे मेन लाइन, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम
मुंबई : यंदाच्या रविवारी गरज असेल, तरच प्रवास करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. २३ एप्रिल रोजी मध्य रेल्वे मेन लाइन, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर तर बारा तासांचा ब्लॉक होणार असून शनिवारी मध्यरात्री ते रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत ब्लॉकचे काम
चालेल.
रुळांची आणि ओव्हरहेड वायरची दुरुस्ती यासह काही तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. सकाळी ११.३0 ते सायंकाळी ४.३0 पर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येतील. विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकात डाऊन लोकल थांबणार नाहीत.
हार्बर मार्गावरही सीएसटी ते चुनाभट्टी, माहीम दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मेन लाइनच्या वेळेप्रमाणेच हा ब्लॉक चालेल. ब्लॉक दरम्यान सीएसटी ते कुर्ला आणि सीएसटी ते वांद्रे दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल, तर पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.
ठाणे ते वाशी, नेरूळ या ट्रान्स हार्बर मार्गावरही रविवारी दुपारी १२.३५ ते दुपारी २.0५ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे ते नेरूळ, वाशी, पनवेल दरम्यानच्या लोकल या वेळेत रद्द करण्यात आल्या आहेत.
हार्बरवर विस्तारीकरणाच्या कामासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून जोगेश्वरी स्थानकात काही कामे हाती घेतली जातील. या कामासाठीही पश्चिम रेल्वेवर बारा तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम २२ एप्रिल रोजी म्हणजेच शनिवारी मध्यरात्री बारा ते दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत चालेल.
या कामामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर राम मंदिर स्थानकात लोकल गाड्यांना थांबा देण्यात येणार नाही.
तांत्रिक कामासाठी ब्लॉक
- रुळांची, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती, काही तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर माटुंगा ते मुलुंड डाऊन धिम्या मार्गावर स.११.३0 ते सायंकाळी ४.३0 पर्यंत ब्लॉक
- हार्बर मार्गावरही सीएसटी ते चुनाभट्टी, माहीम दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक