दहा तासांचा आज ब्लॉक
By admin | Published: September 18, 2016 02:58 AM2016-09-18T02:58:22+5:302016-09-18T06:01:25+5:30
मध्य रेल्वेकडून रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत दहा तासांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : दिवा स्थानकातील डाऊन लोकल मार्गावरील कट कनेक्शनसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत दहा तासांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कारणात्सव १० मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेकडून सहा बस भाड्याने घेण्यात आल्या असून, त्या ठाकुर्ली ते कोपरदरम्यान चालविण्यात येणार आहेत. तर रविवारी हार्बरवर ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. परिणामी, ठाणे, दिवा (नवीन प्लॅटफॉर्म) आणि डोंबिवलीत लोकल थांबतील. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्लीत लोकल थांबणार नाहीत. मुंब्रा स्थानकातून सुटणाऱ्या धिम्या लोकल या ९.३७ ते ५.१८ या कालावधीत डाऊन जलद मार्गावर दिवा ते कल्याणदरम्यान धावतील. या लोकलना दिवा (नवे फलाट) आणि डोंबिवली स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
ब्लॉकच्या वेळेत कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांत डाऊन धिम्या लोकल गाड्यांना थांबा देण्यात येणार नाही. डाऊन धिम्या लोकल सकाळी ८ ते ९.३०पर्यंत तर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत कळवा आणि मुंब्रा स्थानकांत थांबणार नाहीत.
सीएसटीहून सुटणाऱ्या जलद लोकलना सकाळी ७.५३ ते सायंकाळी ५.४१ या वेळेत दिवा स्थानकातील नव्या फलाटावर थांबा देण्यात येईल. सीएसटीकडे येणाऱ्या आणि सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व धिम्या, जलद लोकल या १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. सीएसटी ते कुर्ला, ठाणेदरम्यान विशेष लोकल चालविल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. परिणामी, ठाणे, दिवा आणि डोंबिवलीत लोकल थांबतील. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्लीत लोकल थांबणार नाहीत. मुंब्रा स्थानकातून सुटणाऱ्या धिम्या लोकल डाऊन जलद मार्गावर दिवा ते कल्याणदरम्यान धावतील.