मधुर भांडारकर यांची काँग्रेसकडून नाकाबंदी
By admin | Published: July 16, 2017 12:38 AM2017-07-16T00:38:52+5:302017-07-16T00:38:52+5:30
‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पुण्यात आयोजित दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची पत्रकार परिषद व कार्यक्रम शनिवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले़
- लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘इंदू सरकार’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पुण्यात आयोजित दिग्दर्शक मधुर भांडारकर यांची पत्रकार परिषद व कार्यक्रम शनिवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावले़ काँग्रेस कार्यकर्त्यांनी हॉटेल क्राउन प्लाझामध्ये घुसून तीव्र आंदोलन केले. वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या परवानगीशिवाय हा चित्रपट पुणे शहरात प्रदर्शित केल्यास, पक्षाचेकार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील व चित्रपटांचे प्रदर्शन रोखून धरतील, असा इशारा शहर काँग्रेसने दिला आहे़ गोंधळामुळे पत्रकार परिषद रद्द करावी लागल्याची माहिती भांडारकर यांनी दिली.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे २०१७ हे जन्मशताब्दी वर्ष आहे. ते संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरे करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. त्याला विरोध करण्यासाठीच भाजपाच्या छुप्या पाठिंब्याने मधुर भांडारकर ‘इंदू सरकार’ प्रदर्शित करण्याचा तयारीत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आक्रमक भावनांमुळे भांडारकर यांचे पुण्यातील बावधन परिसरातील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट, कोंढवा व पुणे स्टेशन परिसरातील हॉटेलमध्ये होणारे कार्यक्रम रद्द करावे लागले.
भांडारकर यांची पत्रकार परिषद एनआयबीएम रस्त्यावरील बीटोज बार अँड किचन या हॉटेलमध्ये दुपारी दीड वाजता ठरली होती. मात्र, काँग्रेस कार्यकर्ते तिथे विरोध करू शकतात, हे लक्षात आल्यानंतर ती रद्द करण्यात आली. त्यानंतर, भांडारकर बावधनमधील सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमधील पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी निघाले. मात्र, त्या ठिकाणीही कार्यकर्ते विरोध करण्यासाठी सज्ज असल्याने भांडारकर यांनी तोही कार्यक्रम रद्द केला.ते पुणे स्टेशनजवळील क्राउन प्लाझा या हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर, कार्यकर्त्यांनी तिकडे मोर्चा वळविला. मात्र, भांडारकर यांनी आपली मानसिक स्थिती बरी नसल्याचे कारण सांगून काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त होत काँगे्रसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, नगरसेवक अविनाथ बागवे, डॉ. म. वि. अकोलकर, नगरसेवक युसूफ शेख, यांच्यासह कार्यकर्त्यांनी भांडारकर यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉ.प्रवीण मुंढे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.