BLOG : दोन नातू एकत्र; नव्या समीकरणाची नांदी ठरेल का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 08:27 AM2022-11-22T08:27:23+5:302022-11-22T08:30:19+5:30

Uddhav Thackeray and Prakash Ambedkar : प्रबोधनकारांच्या निमित्ताने दोन मोठे नेते मुंबईत एकाच मंचावर आल्याने आगामी काळात राज्यात आणि देशातही राजकीय समीकरणे बदलू शकतात.

BLOG : Uddhav Thackeray and Prakash Ambedkar Will it be the beginning of a new equation? | BLOG : दोन नातू एकत्र; नव्या समीकरणाची नांदी ठरेल का?

BLOG : दोन नातू एकत्र; नव्या समीकरणाची नांदी ठरेल का?

Next

- धनाजी कांबळे

राजकारणात कधी काय होईल, कोण पहाटे शपथ घेण्यासाठी एकत्र येतील आणि सत्तेसाठी स्वकियांसोबत बंड करून गुवाहाटी व्हाया नागपूर सत्तेचे दावेदार होतील, याचा काही नेम नाही. आजचे राजकारण हे पक्ष किंवा व्यक्तीनिष्ठा यावर नव्हे, तर सत्तेसाठी वाट्टेल ते करण्याच्या दिशेने सुरु आहे. अशातच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार झाल्यावर शिंदे-फडणवीस यांनी राज्याचा कारभार आपल्या हातात घेतला आहे. तरीही जसे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर भाजप ज्या पद्धतीने हे अनैसर्गीक सरकार आहे, असे सांगत होते. तशीच स्थिती आज उलट आहे. 

महाविकास आघाडीत सहभागी असेलेले पक्ष, संघटनांचे नेते आताचे शिंदे-फडणवीस सरकार अनैसर्गिक असल्याचे म्हणत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने काँग्रेसला बुस्टर डोस मिळालेला असला तरी काँग्रेस महाविकास आघाडीसोबतचा घरोबा कायम ठेवेल, का स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाईल, याबाबत साशंकता आहे. किंबहुना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मध्यंतरी केलेल्या स्वबळाच्या विधानांमुळे अद्याप तरी महाविकास आघाडी अभेद्य राहील, असे सांगता येत नाही. परंतु, २५ वर्षे ज्यांनी भाजपसोबत आपली नैसर्गीक आणि वैचारिक आघाडी ठेवली होती. ती शिवसेना आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारपरंपरांचा वारसा सांगत अधिक व्यापकपणे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परीघ वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. 

त्याचाच भाग म्हणून किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर जे लोक आणि पक्ष सोबत येऊ शकतात. त्यांना आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे. त्याचाच भाग म्हणून प्रबोधनकार डॉट कॉमचे लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी मंदिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. प्रकाश यशवंत आंबेडकर आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचे नातू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आगामी निवडणुका एकत्रितपणे लढविण्याचे सुतोवाच केले आहे. २०२४ च्या विधानसभा- लोकसभेच्या निवडणुका आणि आता तातडीने होणा-या मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील इतर महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबतचे अनेकांचे अंदाज आणि आडाखे खोटे ठरविण्याची तयारी सुरू केलेली आहे. 

मुंबईसह महाराष्ट्रात शिवसेनेची म्हणजे उद्धव ठाकरे यांची एक हक्काची वोट बँक आहे, तशीच अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व जाती समूहांना एकत्र करून आलुतेदार-बलुतेदार आणि गरीब कष्टकरी बहुजनांची मोट बांधलेली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मिळालेली ४१ लाख मते अनेकांची डोकेदुखी ठरली होती. तीच स्थिती विधानसभेला देखील दिसून आली. साधारण ३२ ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या विजयाचा वारू वंचितने रोखला होता. तसेच तब्बल २५ लाख २० हजार मते घेतली आहेत. त्यामुळे येणा-या काळात वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याने सगळेच पक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. 

उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र येणार अशी चर्चा सुरु झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राजगृहावर जाऊन अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली होती. ती भेट राजकीय नव्हती असे दोघांनीही म्हटले असले, तरी प्रकाश आंबेडकर यांची भूमिका आगामी निवडणुकांमध्ये महत्त्वाची ठरणार हे कुणालाही नाकारता येणार नाही. त्याचप्रमाणे आंबेडकर यांनी देखील आम्ही भाजप वगळता इतरांसोबत एकत्र जाऊ शकतो असे आधीच म्हटलेले आहे. आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट म्हणून वेगळे असले, तरी ते भाजपसोबत सरकारमध्ये आहेत. त्यामुळे आंबेडकर त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता उरत नसल्याने उद्धव ठाकरे यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीने युती केल्यास महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.

१०० वर्षांपूर्वी प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र आले होते, त्यावेळची सामाजिक परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात मूलभूत फरक दिसतो. आज देखील हे दोन्ही नातू एकत्र येण्याला प्रबोधनकार हा दुवा आहे. वैचारिक भूमिका वेगळ्या असू शकतात, मतभेद असू शकतात, पण आपला शत्रू एक असेल तर त्याविरोधात मोट बांधताना एकत्र यावेच लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केशव सीताराम ठाकरे या दोघांचाही वैचारिक पाया सारखाच होता. आता प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांना भेटले ते विचारांमुळे नव्हे, तर आजची काळाची गरज म्हणून असे दिसते. शत्रूचा शत्रू मित्र असतो. भाजप शत्रू तर त्याचा शत्रू काँग्रेस मित्र व्हावातसे होत नाही. मित्राचा मित्र तो मित्र शिवसेना मित्र असेल, तर शिवसेनेचा मित्र काँग्रेस तसे होताना दिसत नाही. 

बाबासाहेबांनी काँग्रेसला जळतं घर म्हटलं असलं, तरीही आज प्रकाश आंबेडकर यांनी सर्व समविचारी पक्षांसोबत जुळवून घेतलं, तरच त्यांच्याही पक्षाला उज्ज्वल भवितव्य आहे आणि इतर सहकारी प्रस्थापित पक्षांनी देखील बाळासाहेब आंबेडकर यांचा योग्य सन्मान राखला, तर आगामी काळात राज्यासह देशाचेही राजकारण बदलू शकेल. आता हे भांडण धर्माचे नाही तर लोकशाही विरुद्ध हुकूमशाही असे असल्याचं आंबेडकरांनी म्हटलं आहे, तर सत्तापिपासू लोकांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे लोकशाही मजबूत करण्यासाठी जो मतदार महत्वाचा घटक आहे, तो नेमकी काय भूमिका घेतो हे देखील पहावे लागणार आहे. प्रबोधनकारांच्या निमित्ताने सुरू झालेली ही पेरणी आगामी काळात काय परिणाम साधते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ठाकरे-आंबेडकर यांनी साधारण १०० वर्षापूर्वी साधलेल्या ऐक्याने घडवलेला इतिहास महाराष्ट्राने पहिला आहे. आता त्यांचे नातू काय नवा इतिहास घडविणार हे बघावे लागेल...

Web Title: BLOG : Uddhav Thackeray and Prakash Ambedkar Will it be the beginning of a new equation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.