पैशाच्या वादातून व्यावसायिकाचा खून
By admin | Published: January 22, 2016 03:42 AM2016-01-22T03:42:10+5:302016-01-22T03:42:10+5:30
रविवारपासून बेपत्ता असलेल्या एका व्यावसायिक पैशांच्या व्यवहारातून खून झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. औरंगाबाद- नगर रोडवरील एका हॉटेलमध्ये डोक्यात गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला.
औरंगाबाद : रविवारपासून बेपत्ता असलेल्या एका व्यावसायिक पैशांच्या व्यवहारातून खून झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. औरंगाबाद- नगर रोडवरील एका हॉटेलमध्ये डोक्यात गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आला. नंतर तीक्ष्ण हत्याराने शीर वेगळे करून पोत्यात भरलेले धड खाम नदीत फेकण्यात आले. तर शीर पैठण रोडवरील नक्षत्रवाडी शिवारातील नाल्यात फेकण्यात आले होते.
अनिल हवासिंग शर्मा (४५) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून या प्रकरणी मुख्य आरोपी हॉटेल व्यावसायिक संतोष माधवराव पाटील, त्याचा साथीदार संतोष ऊर्फ बापू कांतीलाल जगताप व हॉटेल वेटर राजू अशोक राऊत या तिघांना अटक करण्यात आली आहे.
शर्मा यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे, तर पाटील याचा पूर्वी गारखेडा परिसरात लेडीज बार होता. बारमध्येच पाटील आणि शर्मा यांची ओळख झाली. काही महिन्यांपूर्वी संतोषने शर्मा यांच्याकडून २० लाख रुपये घेतले. नंतर ठरलेल्या मुदतीन त्याने ही रक्कम परत केली नाही. शर्मा यांनी त्याच्याकडे पैशांसाठी तगादा लावला.
पाटीलने हा बार बंद करून नगर रोडवरील गंगापूर फाट्याजवळ एक हॉटेल चालविण्यासाठी घेतले. गेल्या काही दिवसांपासून संतोषने ‘लवकरच पैसे परत करतो,’ असे आश्वासन देत शर्मा यांच्याशी पुन्हा जवळीक साधली होती. वाढदिवसानिमित्त आपण पार्टी देत आहोत, असे सांगून पाटीलने शर्मा यांना रविवारी हॉटेलवर येण्याचे आमंत्रण दिले. तसेच पुण्यातील मित्र बापू जगतापलाही त्याने बोलावून घेतले. पहाटेपर्यंत पार्टी केली. नशेत पैशांचा विषय निघाला आणि भांडण सुरू झाले. तेव्हा संतोषने रिव्हॉल्व्हर काढली आणि तीन गोळ्या अनिल शर्मा यांच्या डोक्यात मारल्या. त्यानंतर वेटर राजू राऊतच्या मदतीने दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली.