सुरक्षारक्षकाचा सहका-याकडून खून
By admin | Published: March 9, 2015 01:53 AM2015-03-09T01:53:09+5:302015-03-09T05:46:15+5:30
गृहसंकुलात एकमेकांशेजारील दोन इमारतींत काम करणाऱ्यांपैकी एका सुरक्षारक्षकाने दुसऱ्याची हत्या केली. मीरारोड येथील शीतलनगर परिसरात हा प्रकार
भार्इंदर : गृहसंकुलात एकमेकांशेजारील दोन इमारतींत काम करणाऱ्यांपैकी एका सुरक्षारक्षकाने दुस-याची हत्या केली. मीरारोड येथील शीतलनगर परिसरात हा प्रकार घडला. पूर्ववैमनस्यातून गळा चिरून हत्या केल्याचा हा प्रकार रविवारी पहाटे ३.३०च्या सुमारास उघडकीस आला. आरोपीला मीरारोड पोलिसांनी घटनास्थळावरून गजाआड केले आहे. जनक प्रसाद शर्मा (२६) असे त्याचे नाव आहे.
जनक शीतल फोरम इमारतीत दोन वर्षांपूर्वी रामसिंग लाठी भंडारी (५५) या वॉचमनसोबत काम करीत होता. हे दोघेही नेपाळच्या आंछम जिल्ह्यातील जुपू ठाणा गावातील आहेत. सध्या जनक शीतल फोरम इमारतीच्या लगत असलेल्या मुकुंद पार्क इमारतीत वॉचमनचे काम करत होता. होळीच्या दिवशी जनक व रामसिंग एकत्र पत्ते खेळत होते. त्यावेळी त्यांचे कडाक्याचे भांडण झाले. त्याचा राग मनात ठेऊन जनकने रामसिंगचा खून केला. तो रविवारी पहाटे ३.३०च्या सुमारास दोन्ही इमारतींच्या दरम्यान असलेल्या लोखंडी शिडी व पाण्याच्या टाकीवरून शीतल फोरम इमारतीच्या टेरेसवर गेला. तेथे दिवसपाळी करून झोपलेल्या रामसिंगला त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यात रामसिंगच्या डोळ्याला मार लागला. या हाणामारीत रामसिंगने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या जनकने रामसिंगच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केला. त्यात रामसिंगचा जागीच मृत्यू झाला. आवाजामुळे इमारतीतील काहींनी टेरेसवर जाऊन पाहिले असता रामसिंग रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी रुग्णवाहिकेला कॉल केला. मात्र त्यातील डॉक्टरांनी रामसिंगला मृत घोषित केले. पोलिसांनी जनकवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)