रक्तदान शिबिरामधून १४८ युनिट रक्त गोळा
By admin | Published: August 10, 2016 11:43 PM2016-08-10T23:43:30+5:302016-08-10T23:43:30+5:30
राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग अंतर्गत झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण १४८ युनिट रक्त गोळा करण्यात विद्यार्थ्यांना यश आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - बोरीवली येथील गोखले शिक्षण संस्थेचे श्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालयाच्या (बी. वर्तक) राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग अंतर्गत झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण १४८ युनिट रक्त गोळा करण्यात विद्यार्थ्यांना यश आहे. श्री सत्य साई सेवा संघटना, मुंबई आणि भगवती रुग्णालय रक्तपेढी, बोरीवली यांच्या सहकार्याने झालेल्या या शिबिरामध्ये यावेळी थॅलेसेमिया चाचणी आणि रक्तगट तपासणीही करण्यात आली.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. एस. व्ही संत, उपप्राचार्य डॉ. एन. बी. आचार्य आणि उपप्राचार्य डॉ. आर. पी. देशपांडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या या शिबिरामध्ये सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना शतकी मजल मारण्यात यश आले. त्याचप्रमाणे तब्बल २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी व परिसरातील नागरिकांनी थॅलेसेमिया चाचणी करुन घेतली. यावेळी प्राचार्या संत यांनी विद्यार्थ्यांना रक्तदानाचे महत्त्व आणि एनएसएस कार्य याबाबत मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक रक्तदात्या विद्यार्थ्याची चौकशीही केली.
विशेष म्हणजे गेल्यावर्षी १० वर्षाहून अधिक काळानंतर शतकी मजल मारलेल्या बी. वर्तक महाविद्यालयाने यंदा सलग दुसऱ्या वर्षी शतकी मजल मारत १४८ युनिट रक्त गोळा करण्यात यश मिळवले. दरम्यान, विद्यार्थ्यांसह शिक्षक, माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला. एनएसएस प्रोग्राम आॅफिसर प्रा. प्रविण गाडगे, प्रा. रामू कोकणी आणि प्रा. मृणाल खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिबिर यशस्वी केले. (प्रतिनिधी)
..............................................
तरुणांनी एचआयव्ही-एड्स बाबत अधिक माहिती घेऊन, त्यापासून दूर रहावे. एचआयव्ही लागण झाल्यानंतर १०-१५ वर्षांनी एड्सचे लक्षण दिसून येतात. आम्ही जेव्हा कधी महाविद्यालयीन स्तरावर रक्तदान शिबिर घेतो तेव्हा तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळतो. आज रक्तदानाबाबत समाजामध्ये वाढलेली जनजागृती अत्यंत आनंदाची बाब असून यामध्ये तरुणांचा असलेला मोठा सहभाग कौतुकास्पद आहे.
- गजानन वाघ, समाजविकास अधिकारी - राज्य रक्त संक्रमण परिषद (एसबीटीसी)
.........................................
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा रक्तदान शिबिरामध्ये मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शिबिर नियोजन करणे आव्हानात्मक ठरले. संपुर्ण एनएसएस टीमसह एकत्रितपणे काम केल्याचा चांगला अनुभव मिळाला. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच रक्तदान केले असल्याने आमच्या प्रयत्नांना मोठे यश आले.
- स्वप्नाली म्हात्रे आणि शुभम जुनघरे (विद्यार्थी प्रमुख, एनएसएस)