दलित तरुणाचा खून; बारा जणांवर गुन्हा
By admin | Published: July 4, 2015 02:54 AM2015-07-04T02:54:53+5:302015-07-04T02:54:53+5:30
अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अटकेतील आरोपी सनी शरद शिंदे याचे सुधारगृहातून अपहरण करून खून केल्याप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अहमदनगर : अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अटकेतील आरोपी सनी शरद शिंदे याचे सुधारगृहातून अपहरण करून खून केल्याप्रकरणी १२ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
नगर महापालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश भोसले यांचाही गुरुवारी रात्री उशिरा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
शुक्रवारी दिवसभर घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात तणाव होता. सायंकाळी पोलीस बंदोबस्तात सनीचा मृतदेह बुरुडगाव येथील त्याच्या घरी आणण्यात आला़ मात्र, मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत त्याचे नातेवाईक हजर नसल्याने पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. सनीच्या खून प्रकरणी त्याची आत्या नंदा घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे़ गुरुवारी सनीच्या नातेवाईकांनी आरोपींच्या अटकेसाठी मोर्चा काढला होता. (प्रतिनिधी)
तरुणाच्या घराला कुलूप
सनीच्या बुरुडगाव येथील घराला कुलूप होते़ बराच वेळ होऊनही त्याचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी पुढे आले नाहीत़ मुलीच्या अपहरण प्रकरणात त्याचे वडील शरद शिंदे व भाऊ अटकेत आहेत. त्यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे़ थोरला भाऊ श्रीरामपूर येथे असतो़ तो सुद्धा रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेला नव्हता. त्याची आई बीडहून नगरकडे येण्यास निघाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
खुनाचा उलगडा : बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातील वांजरा फाट्यावर बुधवारी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला. त्यानंतर नगरच्या सुधारगृहातून अपहरण झालेल्या मुलाचा हा मृतदेह असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले़ अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी अटक केलेल्या सनीला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. त्याच दरम्यान त्याचा खुन करण्यात आला.