रक्तदानाला किंमतच उरली नाही!, १ हजार ९२ युनिट्स रक्त वाया, मुंबईतील रक्तपेढ्यांमधील धक्कादायक स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 05:18 AM2017-09-21T05:18:50+5:302017-09-21T05:18:54+5:30
शहर-उपनगरातील ३४ शासकीय आणि पालिकेच्या रक्तपेढ्यांमधील तब्बल १ हजार ९२ युनिट्स रक्त, जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत वाया गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
मुंबई : शहर-उपनगरातील ३४ शासकीय आणि पालिकेच्या रक्तपेढ्यांमधील तब्बल १ हजार ९२ युनिट्स रक्त, जानेवारी ते जून २०१७ या कालावधीत वाया गेल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या काळात १ हजार ९२ युनिट्स म्हणजेच, जवळपास ३८२ लीटर रक्त वाया गेले आहे. रक्तपेढ्यांमधील अपुºया व्यवस्थापनामुळे हे रक्त वाया गेल्याचे, माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आली आहे. त्यामुळे दात्यांच्या रक्तदानाला किंमतच उरली नसल्याचे चित्र आहे.
बºयाचदा रक्तपेढ्यांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रक्ताची साठवणूक झालेली असते. अशा परिस्थितीत रक्तपेढ्यांनी अन्य पेढ्यांशी संवाद साधून हे रक्त वापरले पाहिजे, परंतु रक्तपेढ्यांमध्ये संभाषणाचा अभाव दिसून आल्याने, या पेढ्यांमधील रक्ताची देवाणघेवाण होताना दिसत नाही, तसेच शहर-उपनगरात केवळ ‘रेकॉर्ड्स’च्या नावाखाली रक्तदान शिबिरे राबविली जातात. या शिबिरांमधील दान केलेल्या रक्ताची वैधता एकाच वेळी संपते. त्यामुळे बºयाचदा रक्त वाया जाते. त्याचप्रमाणे, राजकीय नेते आणि संस्था, संघटनांच्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात रक्तदान आयोजित केले जाते, परंतु त्याचा वापर मात्र तितका होत नाही. त्यामुळे रक्त वाया जाण्याचे प्रमाण वाढताना दिसते.
विविध सामाजिक संस्था, तसेच राजकीय पक्षांकडून रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या वेळी गोळा करण्यात आलेल्या रक्ताचा वापर सुयोग्य पद्धतीने, तसेच क्रमवारीने करावा लागतो. रक्तसंकलन झाल्यावर त्यात एचआयव्ही, मलेरिया, कावीळ, तसेच संसर्गविरहित रक्ताची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. त्यानंतर, रक्तातील घटकांचे विघटन करून, त्यांची साठवणूक करण्यात येते. क्रमवारीमध्ये जे रक्त प्रथम रक्तपेढीमध्ये येते, त्यांचे वितरण आधी करणे अपेक्षित असते. प्रत्यक्षात ही क्रमवारी पाळली जात नाही. त्यामुळे रक्तसंचय झाला, तरी ठरावीक मुदतीमध्ये रक्त वितरित केले जात नाही, या पिशव्या फेकून द्याव्या लागतात. याविषयी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. अरुण थोरात यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही.
>या रक्तपेढ्यांचा परवाना रद्द होणार
मुंबईतील सेंट जॉर्ज, नायर, कामा आणि व्ही. एन. देसाई या रक्तपेढ्यांच्या परवान्यांची वैधता डिसेंबर महिन्यांत संपणार आहे, तर सर जे. जे. रुग्णालय, वांद्रे भाभा आणि टाटा रुग्णालयाच्या रक्तपेढ्यांचे परवाने नूतनीकरणाच्या प्रक्रियेत आहेत.
>‘रक्त संक्रमण अधिकाºयांची’ही वानवा
नियमानुसार रक्तपेढ्यांमध्ये किमान चार रक्त संक्रमण अधिकारी हवेत. मात्र, शहर-उपनगरातील ९रक्तपेढ्यांमध्ये चारपेक्षा कमी रक्त संक्रमण अधिकारी असल्याचेही माहिती अधिकारातून समोर आले आहे. त्यात आयएनएचएस अश्विनी, वांद्रे भाभा, नायर, सायन, राजावाडी, कामा, व्ही. एन. देसाई, भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर आणि टाटा मेमोरिअलच्या रक्तपेढ्यांचा समावेश आहे.
>खासगी रक्तपेढ्यांवर कोणाचे नियंत्रण?
खासगी रक्तपेढ्यांवर कोणाचे नियंत्रण आहे, त्यांच्याबाबतचे नेमके निकष कोणते, अशी विचारणा परिषदेने माहिती आयुक्तांकडे केली आहे. याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे समजते.
>गेल्या वर्षी रक्तसंकलनात मुंबई आघाडीवर
गेल्या वर्षभरात झालेल्या रक्तसंकलनात मुंबईने सर्वाधिक (३ लाख ४० हजार युनिट) रक्तसंकलन केले. त्या पाठोपाठ पुणे (२ लाख ५० हजार), नागपूर (१ लाख २८ हजार), ठाणे (१ लाख २५ हजार) आणि सोलापूर (१ लाख ०२ हजार) या जिल्ह्यांचा क्रमांक आहे.