नागपुरात रक्तदानाचा विक्रम, ६ तासांत १५५ जणांचे रक्तदान
By admin | Published: July 2, 2016 07:42 PM2016-07-02T19:42:17+5:302016-07-02T19:42:17+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली
Next
>ऑनलाइन लोकमत -
जवाहरलालजी दर्डा यांची जयंती साजरी : पहिल्यांदाच रक्तदान करणा-यांची संख्या लक्षणीय
नागपूर, दि. 02 - लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. ‘लोकमत’ आणि ‘डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनेंट सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी लोकमत भवनातील ‘बी-विंग’ अकराव्या माळ्यावर आयोजित या रक्तदान शिबिरात केवळ ६ तासांत १५५ जणांनी रक्तदान करून विक्रम स्थापन केला. विशेष म्हणजे, रक्तदानासाठी नागपूरसह आजूबाजूच्या तालुक्यातून रक्तदाते आले होते. पहिल्यांदाच रक्तदान करणा-यांची संख्या लक्षणीय होती.
शिबिराचे उद्घाटन बाबूजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाले. याप्रसंगी लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूरचे महानगर संघचालक राजेश लोया, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. दिलीप गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमत ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले.
कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी, कुणाच्या तरी आयुष्यात हसू उमलण्यासाठी रक्तदान महत्त्वाचे असते, या जाणिवेतूनच रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. शिबिरात तरुणांसोबतच महिलांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. एक सामाजिक जाणीव म्हणून लोकमतचे वाचक, कर्मचारी, युवा नेक्स्टचे सदस्य व सखी मंच सदस्यांनी शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. १८ ते ६१ वर्षांपर्यंतच्या दात्यांनी रक्तदान केले. सकाळी १०.३० वाजतापासून सुरू झालेल्या या शिबिरात सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत रक्तदात्यांनी रक्तदान केले