नवस फेडण्यासाठी तरुणाचा रक्ताभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2016 05:02 AM2016-11-02T05:02:13+5:302016-11-02T05:02:13+5:30
गेवराई तालुक्यातील भाटेपुरी येथे नवस फेडण्यासाठी एका तरुणाने सोमवारी करंगळी कापून महादेवाला रक्ताचा अभिषेक घातला
शिरसदेवी (जि. बीड ) : गेवराई तालुक्यातील भाटेपुरी येथे नवस फेडण्यासाठी एका तरुणाने सोमवारी करंगळी कापून महादेवाला रक्ताचा अभिषेक घातला. त्याच्याविरुद्ध तलवाडा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला अटक केली आहे.
भाटेपुरी येथे महादेवाचे पुरातन मंदिर असून महादेव जायकू उबाळे (रा. सिरसदेवी) याने मूल व्हावे म्हणून साकडे घातले होते. मूल होताच नवस फेडण्यासाठी त्याने भावनेच्या भरात सोमवारी दुपारी पुजारी जेवणासाठी गेल्याची संधी पाहून महादेवाच्या पिंडीवर करंगळी कापून रक्ताभिषेक केला.
पुजारी विष्णू आडाळे हे परत आल्यावर त्यांना महादेवाच्या पिंडीवर रक्त आढळले. त्यांनी चौकशी केल्यावर महादेव उबाळे याने आपणच हा रक्ताभिषेक केल्याचे सांगितले. त्यानंतर त्याची माहिती मठाधिपती भगवंत महाराज पुरी यांनी तलवाडा पोलिसांना कळविली. (प्रतिनिधी)