उत्तरपत्रिका न दाखवल्याने खून
By admin | Published: December 15, 2015 02:39 AM2015-12-15T02:39:49+5:302015-12-15T02:39:49+5:30
उत्तरपत्रिका दाखविण्यावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी होऊन, एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी आकोट येथील बाबू जगजीवनराम कनिष्ठ महाविद्यालयात घडली.
आकोट (अकोला) : उत्तरपत्रिका दाखविण्यावरून दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी होऊन, एकाचा खून झाल्याची घटना सोमवारी आकोट येथील बाबू जगजीवनराम कनिष्ठ महाविद्यालयात घडली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आकोट बंदचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी तो हाणून पाडला.
परीक्षेच्या उत्तरपत्रिका सोमवारी सकाळी शिक्षिकेने विद्यार्थी शुभम ढगे (१६) याला कार्यालयात ठेवण्यास सांगितल्या. तेवढ्यात ऋषभ रायबोले याने त्याच्याकडे आपली उत्तरपत्रिका पाहण्यासाठी मागितली. शुभमने नकार दिल्याने वाद झाला. ऋषभने शुभमला मारहाण केली. त्यात त्याच्या छाती व गुप्तांगाला जबर दुखापत झाली. ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी शुभमला मृत घोषित केले.
ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरून ग्रामीण रुग्णालयावर मोठा जमाव धडकला. काहींनी आकोट बंद करण्यासाठी कॉटन मार्केटकडे धाव घेतली. तिथे दगडफेक झाली. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. त्यानंतर ऋषभविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)