शहरी तरुणांची व्यसनेच वाढवताहेत रक्तदाब
By Admin | Published: May 18, 2016 04:03 AM2016-05-18T04:03:03+5:302016-05-18T04:03:03+5:30
जागतिक स्पर्धेमुळे तरुणांना कार्पोरेट सेक्टरमध्ये टिकून राहण्यासाठी निश्चित वेळेपेक्षा अधिक वेळ काम करावे लागते.
भार्इंदर : जागतिक स्पर्धेमुळे तरुणांना कार्पोरेट सेक्टरमध्ये टिकून राहण्यासाठी निश्चित वेळेपेक्षा अधिक वेळ काम करावे लागते. यामुळे त्यांच्या आहार घेण्याच्या जीवनशैलीत बदल होत असून कामाचा वाढता व्याप तसेच पिझ्झा, बर्गर, फ्रॅन्की आदी जंक फुडचे सेवन, धुम्रपानच्या सवयी यांमुळे तरुणांत उच्च रक्त दाबाचे प्रमाण वाढत असल्याची माहिती हृदयरोगतज्ञ डॉ. चेतन भांबुरे यांनी दिली. १७ मे रोजी ‘जागतिक उच्च रक्त दाब दिन’ असतो, त्यानिमित्ताने डॉ. भांबुरे यांनी ही माहिती दिली.
कामाच्या ताणतणावात आपल्याला उच्च रक्तदाब असल्याची जाणीव तरुणांना होत नसल्याने त्यांचे उपचारांकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे चोरपावलांनी शरीरात प्रवेश करणारा उच्च रक्तदाब आरोग्याला धोकादायक ठरतो. रक्तदाबाचा त्रास जितका जास्त तितकाच हृदयविकाराचा झटका येण्याची अथवा हृदय बंद पडण्याची शक्यता अधिक बळावते. काही तरुणांमध्ये ही लक्षणे आजार तीव्र होईपर्यंत दिसत नाहीत.ज्यावेळी आजार गंभीर स्वरुप धारण करुन लक्षणे अधिक तीव्र करतो. त्यावेळी मात्र आजाराची लागण झाल्याची जाणीव होते. तोपर्यंत शरीरातील मुत्रपिंड, डोळे व हृदय या संवेदनशील इंद्रियांवर दुष्परिणाम झालेले असतात.
उच्च रक्तदाबामुळे हृदयाच्या अतिरीक्त कार्यामुळेच त्याच्या ठोक्यांवर परिणाम होऊन ते बंद पडण्याची शक्यता असते.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तणावाचे प्रमाणही वाढते असून ते सहन करण्याची मानसिक शक्ती मात्र नसते. विशी पंचविशीचे तरुणही याला बळी पडताना दिसतात. त्यामुळे त्यांना याचा बराच त्रास होतो. परिणामी त्यांच्या शरीरात उच्च रक्तदाब आजार प्रवेश करुन त्यांचे आयुष्य कमी करण्यास सुरुवात करतो.
येत्या ४ वर्षांत देशातील एकुण लोकसंख्येपैकी ३० कोटी लोकांना हा आजार जडण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे योग्य व वेळेत आहाराचे सेवन, धुम्रपान न करता पुरेसा व्यायाम शरीराला आवश्यक असुन तणावरहित जीवनच उच्च रक्तदाबाला थोपवता येऊ शकते, असेही डॉ. भांबुरे म्हणाले. (प्रतिनिधी)