ठाण्यात खंडणीखोराचा खून

By admin | Published: December 15, 2014 04:00 AM2014-12-15T04:00:07+5:302014-12-15T04:00:07+5:30

खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देणाऱ्या मोनू टपाल या सराईत खंडणीखोराचा तिघांनी मिळून खून केला. ही घटना वागळे इस्टेट भागात घडली.

The blood of the ransom in Thane | ठाण्यात खंडणीखोराचा खून

ठाण्यात खंडणीखोराचा खून

Next

ठाणे : खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देणाऱ्या मोनू टपाल या सराईत खंडणीखोराचा तिघांनी मिळून खून केला. ही घटना वागळे इस्टेट भागात घडली. विशेष म्हणजे ज्या कोयत्याची भीती दाखवून त्याने एक हजाराच्या खंडणीची मागणी केली होती, त्याच कोयत्याने त्याचा खून करण्यात आला.
मोनू हा अश्विनीकुमार द्विवेदी यांना अडीच महिन्यांपासून हप्ता देण्यासाठी धमकावत होता. कंटाळून अश्विनीकुमार यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात १३ डिसेंबरला रात्री ८.२० वा. तक्रारही दाखल केली होती. हा प्रकार झाल्यानंतर मोनू आणि त्याच्या साथीदारांनी रिक्षाचालक राजेश कुरेकर, वीरू सिंग आणि संतोष जनेवाल (रा. हनुमाननगर) यांच्याकडे एक हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. १४ डिसेंबर रोजी पहाटे २ वा.च्या सुमारास हे तिघेही मामाभाचे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उद्यानाजवळ दारू पिण्यासाठी बसले होते. तेव्हा मोनू तिथे आला आणि कोयत्याने मारण्याची धमकी देऊ लागला.
या तिघांनी मोनूच्या हातातला कोयता घेऊन त्याच कोयत्याने त्याचा खून केला. नंतर, मात्र हे तिघेही पसार झाले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मोनूचा खून करण्यात आला, त्याच ठिकाणी मोनूने चार ते पाच वर्षांपूर्वी याकूब याचा खून केला होता. मोनूवर सात ते आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.जी. खैरनार यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The blood of the ransom in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.