सरसकट कर्जमाफीसाठी राज्यपालांना रक्तरंजीत पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 02:49 PM2020-02-25T14:49:10+5:302020-02-25T14:51:30+5:30
सरसकट कर्जमाफीसाठी लिहिलेली पत्रं घेऊन भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी ही पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत.
मुंबई - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफी देऊ केली आहे. या कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र भाजपने ही कर्जमाफी फसवी असल्याचा दावा केला आहे. या कर्जमाफीवरून भाजप आक्रमक झाले असून राज्यपालांना शेतकऱ्यांच्या सरकट कर्जमाफीसाठी 50 हजार पत्र लिहिण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, सातबारा कोरा करावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 50 हजार पत्र राज्यपालांना लिहिण्यात आली आहेत. यापैकी काही पत्र शेतकऱ्यांनी रक्ताने लिहिल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. ही पत्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राज्यपालांकडे सोपविली जाणार आहेत.
सरसकट कर्जमाफीसाठी लिहिलेली पत्रं घेऊन भाजपचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज संध्याकाळी ही पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत.
तत्पूर्वी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील कर्जमाफी झालेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापुढील याद्या लवकरच येणार आहेत. तर ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे.