‘तो’ फलक उखडून टाका
By admin | Published: May 6, 2016 02:29 AM2016-05-06T02:29:02+5:302016-05-06T02:29:02+5:30
पश्चिमेकडील कोपरगावातील गावदेवी, महादेव आणि हनुमान मंदिरात मॅक्सी(गाऊन) घातलेल्या महिलांना प्रवेश न देण्याचे फलक लावल्याने महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
डोंबिवली : पश्चिमेकडील कोपरगावातील गावदेवी, महादेव आणि हनुमान मंदिरात मॅक्सी(गाऊन) घातलेल्या महिलांना प्रवेश न देण्याचे फलक लावल्याने महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी हा निर्णय घेतल्याचा दावा ग्रामस्थ करीत असले तरी अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाने धर्मस्थळे विनाशर्त महिलांकरिता खुली करण्याचे स्पष्ट आदेश दिले असल्याने हा निर्णय बेकायदा आहे. डोंबिवलीमधील स्थानिक महिलांनी हे फलक उखडून फेकून द्यावे. अन्यथा आपण स्वत: डोंबिवलीत येऊन फलक काढू, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे.
ग्रामस्थांनी सर्वानुमते हा निर्णय घेतला असून मंदिराचे पावित्र्य कायम रहावे यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी दिली. ते म्हणाले की, या निर्णयात गैर काहीच नाही. महिला मॅक्सी घालून घरची कामे करतात. मासांहारी जेवण शिजवतात. काही ठिकाणी हे कपडे दररोज धुतलेही जात नाही. त्यामुळे असे कपडे घालून देवाची आराधना करणे योग्य नाही. दोन वर्षात या निर्णयाला कुणीही विरोध केलेला नाही. परिसरातील बहुतांश महिला नियमाचे पालन करीत आहेत, असे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. तृप्ती देसाई यांना मुंबईतील हाजी अली दर्ग्यात प्रवेशादरम्यान रोखण्यात आले. अगोदर त्यांनी दर्ग्यात प्रवेश करावा व मगच डोंबिवलीतील फलक उखडावा, असे आव्हानही म्हात्रे यांनी दिले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे अत्यंत सुधारणावादी होते. त्यांनी जर डोंबिवली शहरात लागलेला हा फलक पाहिला असता तर स्वत: उखडून फेकला असता, अशी भावना अनेक पुरोगामी महिला कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.
तृप्ती देसाई यांचे लक्ष या प्रकाराकडे वेधले असता त्या म्हणाल्या की, हा फलक अत्यंत निषेधार्ह आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कुठल्याही निकषावर महिलांचा मंदिर प्रवेश रोखता येणार नाही, असे स्पष्ट केले असल्याने असे फलक लावणे हे पुरुषी मानसिकतेचे लक्षण आहे. मंदिर व देवाचे पावित्र्य कसे राखायचे हे महिलांना कुणी शिकवण्याची गरज नाही. ९० टक्के घरांत पूजा महिलाच करतात. स्थानिक महिलांना आवाहन आहे की, त्यांनी स्वत: हे फलक उखडून फेका. मला स्वत:ला डोंबिवलीत येणे शक्य झाले तर ते फलक उखडून फेकून देईन. (प्रतिनिधी)
हे तर पुरूषी मानसिकतेचे लक्षण
हा फलक अत्यंत निषेधार्ह आहे. मुंबई उच्च न्यायालयाने कुठल्याही निकषावर महिलांचा मंदिर प्रवेश रोखता येणार नाही, असे स्पष्ट केले असल्याने असे फलक लावणे हे पुरुषी मानसिकतेचे लक्षण आहे. असे तृप्ती देसाई यांनी सांगितले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रदेश सरचिटणीस सुशीला मुंडे म्हणाल्या की, महिलांच्या मंदिर प्रवेशाचा लढा आम्ही २००० सालापासून लढत आहोत. याबाबतची याचिका आम्हीच केली होती.
त्यामुळे डोंबिवलीतील मंदिरात लागलेले फलक बेकायदा असून ते तात्काळ काढणे गरजेचे आहे. संस्कृतीच्या ठेकेदारांच्या विरोधात आंदोलन करायचे किंवा कसे याचा निर्णय अंधश्रद्धा निर्मूलन समिती घेईल, असेही त्या म्हणाल्या.
पुरुष किती नियम पाळतात
महिलांनी मॅक्सी (गाऊन) घालून मंदिरात जावे किंवा कसे याचा निर्णय वैयक्तीत असून तशी सक्ती असू नये. मात्र मंदिरात जाताना कोणती काळजी घ्यावी हे डोंबिवलीतील महिलांना कळते, अशा शब्दांत स्थानिक महिलांनी आपली भावना व्यक्त केली.
अनेक मंदिरांमध्ये मोबाईल फोन सायलेंटवर ठेवा इथपासून ते मोठ्याने बोलू नका, असे फलक लावलेले असतात. मात्र पुरुष त्यापैकी किती सूचनांचे पालन करतात, असा सवाल काही महिलांनी केला.