माळीणच्या मानसिक पुनर्वसनासाठी मदतीची फुंकर

By admin | Published: March 26, 2017 01:38 AM2017-03-26T01:38:49+5:302017-03-26T01:38:49+5:30

घरे बांधून भौतिक पुनर्वसन झालेच; पण डोंगर कोसळल्याने झालेल्या जखमांवर सिटी कॉर्पोरेशनसारख्या संस्थांनी

Blowing to help Malin's mental rehabilitation | माळीणच्या मानसिक पुनर्वसनासाठी मदतीची फुंकर

माळीणच्या मानसिक पुनर्वसनासाठी मदतीची फुंकर

Next

पुणे : घरे बांधून भौतिक पुनर्वसन झालेच; पण डोंगर कोसळल्याने झालेल्या जखमांवर सिटी कॉर्पोरेशनसारख्या संस्थांनी मदतीच्या रूपाने फुंकर घातली आहे. माळीण गावाचे मानसिक पुनर्वसनही होत आहे. त्यातून गावकऱ्यांना नवीन उमेद मिळाली आहे.
आंबेगाव तालुक्यात भिमाशंकरजवळ निसर्गाच्या सानिध्यात वसलेले छोटेसे टुमदार माळीण गाव. ३० जुलै २०१४ रोजी झालेल्या पावसामुळे डोंगराचा कडा कोसळून संपूर्ण माळीण गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले अन् होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत १५१ जणांचा बळी गेला. आज या साऱ्या जखमा, दु:ख, दुर्घटनेच्या खूणा पुसत पुन्हा एकदा नव्या दिमाखात देखणे माळीण गाव उभे राहिले आहे.
माळीण दुर्घटनेनंतर उर्वरित लोकांचे जीवनमान पूर्वपदावर आणणे आणि गावाचे पुर्नवसन करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर होते. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी त्यासाठी आवाहन केले. सिटी कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अनिरुध्द देशपांडे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. सामाजिक बांधिलकी म्हणून घरांच्या बांधणीसाठी आवश्यक असलेला निधी सीएसआर फंडातून उपलब्ध करून दिला. जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील दहा वर्षांसाठी माळीण गाव दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार गेल्या सहा महिन्यांपासून गावात काम सुरु केले आहे. यामध्ये सर्वप्रथम गावातील लोकांसाठी विविध प्रकारची पाच आरोग्य शिबिरे घेण्यात आली. यामध्ये लोकांना आवश्यक असलेली सहा महिन्यांची औषधे मोफत देण्यात आली. महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना गोधडी बनविण्याचे प्रशिक्षण दिले. महिलांनी बनविलेल्या गोधड्या व इतर वस्तूचे मार्केटींग करण्याची जबाबदारी देखील सिंटी कॉर्पोरेशन घेतली आहे. विविध प्रकारच्या चटण्या तयार करून त्यांची पुण्यातील विविध मॉलमध्ये विक्री करण्यासाठी देखील पुढाकार घेतला आहे. माळीण गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हे गाव दत्तक घेतले असल्याचे देशपांडे यांनी स्पष्ट केले.
आमडे गावांमध्ये पुर्नवसन करण्याचे निश्चित झाल्यावर शासनाच्या निकषानुसार २६९ चौरस फुटांचेच घर बांधण्यात येते. त्यासाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपयांचे अनुदान मिळते. जिल्हाधिकारी राव यांनी पुढाकार घेऊन सीओईपीकडून ४२५ चौरस फुटाच्या घरांचा आराखडा तयार करून घेतला. यामुळे घरांच्या बजेटमध्ये मोठी वाढ झाली. हा वाढीव निधी करण्यासाठी राव यांनी विविध सामाजिक संस्था, कार्पोरेट कंपन्यांना सीएसआर फंडातून निधी देण्याचे आवाहन केले. सिटी कॉर्पोरेशनसह पुणे जिल्हा परिषद, मर्सिडीझ बेंझ, फॉक्स वॅगन, एम्पथी फाउंडेशन यांच्यासह अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचा पगार माळीणच्या पुर्नवसनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला.

गावावर डोंगरच कोसळल्याने माळीणच्या ग्रामस्थांना धक्का बसला होता. त्यांची मानसिक अवस्थाही वाईट होती. माळीण गावात गेल्यावर दुर्घटनाग्रस्त लोकांशी चर्चा केली. यावेळी केवळ निधी देऊन आपली जबाबदारी संपणार नसल्याची जाणीव झाली. या लोकांच्या भविष्यासाठी, त्यांचे आरोग्य प्रश्न यावर ठोक काम करण्याची गरज असल्याचे लक्षात आले. यामुळे जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून पुढील दहा वर्षांसाठी माळीण गाव दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार गेल्या सहा महिन्यांपासून गावात काम सुरु केले आहे.
- अनिरुद्ध देशपांडे, अध्यक्ष, सिटी कॉर्पोरेशन

पुनर्वसनाचे आदर्श मॉडेल
४जिल्हा प्रशासन, विविध समाजिक संस्था व सर्वसामान्य नागरिक यांच्या मदतीने आराखड्यात मंजूर करण्यात आलेल्या ६७ घरांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते, अंगणवाडी केंद्र, संरक्षण भिंत अशा १८ पायभूत सुविधांनी सज्ज असे अत्यंत देखणे पुनर्वसित माळीण गाव उभे राहिले आहे. सर्व सोयी-सुविधायुक्त असे माळीण गावा हे देशातील पुर्नवसनाचे आदर्श मॉडेल असल्याचे सौरभ राव यांनी सांगितले.

Web Title: Blowing to help Malin's mental rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.