31 जानेवारीला दिसणार ब्ल्यू मून, तीन सूर्यग्रहणे, दोन चंद्रग्रहणांसह उल्का वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 09:13 PM2018-01-12T21:13:55+5:302018-01-12T21:14:27+5:30
एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येत असतील, तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्राला खगोलशास्त्रात ब्ल्यू मून म्हणण्याचा प्रघात आहे. हा ब्ल्यू मून यंदा 31 जानेवारीला दिसणार आहे. याव्यतिरिक्त यंदा तीन सूर्यग्रहण, दोन चंद्रग्रहण, उल्का वर्षावासह खगोलीय घटनांची रेलचेल राहणार आहे.
अमरावती : एकाच महिन्यात दोन पौर्णिमा येत असतील, तर दुस-या पौर्णिमेच्या चंद्राला खगोलशास्त्रात ब्ल्यू मून म्हणण्याचा प्रघात आहे. हा ब्ल्यू मून यंदा 31 जानेवारीला दिसणार आहे. याव्यतिरिक्त यंदा तीन सूर्यग्रहण, दोन चंद्रग्रहण, उल्का वर्षावासह खगोलीय घटनांची रेलचेल राहणार आहे.
जानेवारी महिन्यातील पहिली पौर्णिमा 2 तारखेला होती. कोणत्याही दोन पौर्णिमांमध्ये 29.5 दिवसांचे अंतर असते. त्यामुळे जेव्हा पहिली पौर्णिमा महिन्याच्या सुरुवातीला येते तेव्हा दुसरी पौर्णिमा त्याच महिन्याच्या शेवटी येते. फेब्रुवारी हा महिना 28 दिवसांचा असल्याने या महिन्यात दोन पौर्णिमा कधीच येत नाहीत. हा महिना वगळता कोणत्याही महिन्यात दोन पौर्णिमा येऊ शकतात. ब्ल्यू मूनची सर्वात जुनी नोंद सन 1528 मधील आहे. कधी कधी एकाच वर्षात दोन वेळा ब्ल्यू मून पाहता येतो. त्यानुसार यंदा पुन्हा ३१ मार्चला ब्ल्यू मून दिसणार आहे. एकाच वर्षात दोनदा ब्ल्यू मून दिसण्याचे चक्र 19 वर्षांनी असते. ब्ल्यू मूनचा चंद्र इतर पौर्णिमांच्या चंद्राप्रमाणेच असतो. यात कोणत्याही प्रकारचे वेगळेपण नसते. त्यामुळे 31 जानेवारीच्या पौर्णिमेच्या चंद्रात उगाचच निळेपणा शोधण्याचा प्रयत्न करू नये. अवकाशातील कोणतीही घटना असली की, त्यामागे अंधश्रद्धा जोडल्या जातात. यावर अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे प्रवीण गुल्हाने व अमरावतीचे हौशी खगोल अभ्यासक विजय गिरूळकर यांनी केले आहे.
दोन खग्रास चंद्रग्रहण भारतात दिसणार
यंदा 31 जानेवारी व 27 जुलै ही दोन चंद्रग्रहणे भारतात दिसणार आहेत. 31 जानेवारीला खग्रास स्थितीत चंद्रोदय व 31 चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने सुपरमूनचे दर्शन घडणार आहे. या दिवशी खग्रास स्थिती, सुपरमून व ब्ल्यू मून असा त्रिवेणी योग आहे. विविध तारखांना उल्का वर्षाव अवलोकता येणार आहे. 31 जुलैला मंगळ, 10 मे रोजी गुरू, 27 आॅक्टोबरला शुक्र व 27 जूनला शनी पृथ्वीच्या जवळ येणार आहे.