निळी पाखरं वेगवेगळ्या राजकीय फांद्यांवर!

By Admin | Published: February 17, 2017 03:27 AM2017-02-17T03:27:49+5:302017-02-17T03:27:49+5:30

राज्यातील दहा महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षांचे विविध गट वेगवेगळ्या पक्षांसोबत तर आहेतच, पण एकच पक्ष वेगवेगळ्या

Blue sharks on different political branches! | निळी पाखरं वेगवेगळ्या राजकीय फांद्यांवर!

निळी पाखरं वेगवेगळ्या राजकीय फांद्यांवर!

googlenewsNext

यदु जोशी / मुंबई
राज्यातील दहा महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षांचे विविध गट वेगवेगळ्या पक्षांसोबत तर आहेतच, पण एकच पक्ष वेगवेगळ्या पक्षांबरोबर असल्याचेही चित्र बघायला मिळत आहे. रिपब्लिकन नेत्यांचे महत्त्व कितपत उरले हा वादाचा प्रश्न असला, तरी निळ्या झेंड्याचे महत्त्व चांगले ठाऊक असलेल्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी रिपाच्या वेगवेगळ्या गटातटांना जवळ केले आहे.
आठवलेंची सर्वदूर फरफट
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टीची भाजपाबरोबर फरफट चालली आहे. मुंबईत आधी त्यांना २५ जागा देण्याचे भाजपाने जाहीर केले. प्रत्यक्षात १७ जागा दिल्या. त्यातील ६ जागांवर भाजपाचे उमेदवार कमळावर लढत असल्याने गोंधळाची स्थिती आहे. ११ जागांवर भाजपाचा उमदेवार नाही. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये रिपाइंच्या उमेदवारांना भाजपाने कमळावर उभे केले. त्यांची रिपाइंने हकालपट्टी केली आहे. पुण्यात रिपाइंचे अधिकृत सात तर पिंपरी-चिंचवडमध्ये तीन उमेदवार आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर म्हणाले की, भाजपाने अधिक सन्मानाने युती करायला हवी होती पण आता त्यांनी मुंबईत ज्या सहा जागांवर आमच्या विरोधात उभे केले आहेत तेथे त्यांचे नेते आता आमच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती उरलेली नाही.
अर्जून डांगळे हे पूर्वी आठवले समर्थक असलेले नेते आता शिवसेनेसोबत आहेत.
आंबेडकरांची वेगळी आघाडी
भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस वा राष्ट्रवादीसोबत न जाता दोन्ही डावे पक्ष आणि अन्य लहान पक्षांची वेगळी आघाडी तयार केली आहे. ते मुंबईत ८०, पुण्यात ४०, अकोला ६५, नागपूर २२, ठाणे २५, नाशिक २४ आदी जागा लढत आहेत. आ.जोगेंद्र कवाडे यांच्या पीरिपाची मुंबईत काँग्रेसशी तर ठाण्यात चक्क शिवसेनेशी युती आहे. नागपुरात त्यांनी काही रिपब्लिकन गटांची मोट बांधून रिपब्लिकन फ्रंट तयार केला हा फ्रंट राष्ट्रवादीसोबत आहे. अमरावती, सोलापुरात ते काँग्रेससोबत आहेत तर उल्हासनगरमध्ये स्वबळावर लढत आहेत.
शहर बदलले पाठिंबा बदलला
लाँगमार्चचे प्रणेते प्रा.आ.जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या पक्षांना पाठिंबा आहे. मुंबईत त्यांचा पक्ष काँग्रेससोबत आहे. काँग्रेसने त्यांना सात जागा सोडल्या पण सगळे उमेदवार पंजावरच लढत आहेत. चर्चा अशी आहे की सातपैकी बहुतेक उमेदवार काँग्रेसनेच दिले पण ते पीरिपाच्या कोट्यात टाकण्यात आले. पीरिपाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांचे फोटो मुंबईत राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या पोस्टरवर झळकलेले दिसतात. प्रत्यक्षात त्यांचा पाठिंबा काँग्रेसला आहे.
गवई गट स्वबळ अन् काँग्रेससोबतही
दिवगंत नेते रा.सू.गवई यांच्या रिपब्लिकन पार्टीची सूत्रे आता त्यांचे पुत्र डॉ.राजेंद्र गवई सांभाळतात. त्यांनी त्यांच्या अमरावती या गृह जिल्ह्यात स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत. महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांत ते सर्व ताकदीनिशी लढत आहेत. मुंबई, पुणे सोडून इतर महापालिकांमध्ये ते काँग्रेससोबत आहेत.
बसपाचा एकला चलो रे
बहुजन समाज पार्टी नेहमीप्रमाणे स्वबळावर लढत आहे. इतर पक्षांच्या नादी लागण्याचे त्यांनी सुरुवातीपासून टाळले आणि एक विश्वासार्हता मिळविली आहे. मुंबईत १४० जागा लढवताना बसपाने ९० जागांवर मुस्लिम आणि उत्तर भारतीयांना उमेदवारी दिली आहे.
दलित उमेदवार तर आहेतच. या सोशल इंजिनियरिंगचा मोठा फायदा होईल, असे पक्षाला वाटते. पुणे ६०, नागपूर १०७, पिंपरी-चिंचवड २२, ठाणे २५, नाशिक ६०, उल्हासनगर २२, अमरावती ६० आणि अकोला १० अशा जागा बसपा लढवत आहे.

Web Title: Blue sharks on different political branches!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.