‘ब्लू व्हेल गेम’च्या नादात तो निघाला पुण्याला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 02:40 AM2017-08-10T02:40:57+5:302017-08-10T02:41:53+5:30
‘ब्लू व्हेल गेम’चा टास्क पूर्ण करण्याच्या नादात सोलापूर येथील १४ वर्षीय किशोरवयीन मुलगा पुण्याच्या दिशेने जात होता. हे लक्षात येताच सोलापूर पोलिसांनी भिगवण पोलिसांना संपर्क साधून भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस एन. एम. राठोड यांनी तातडीने कार्यवाही केली.
भिगवण : ‘ब्लू व्हेल गेम’चा टास्क पूर्ण करण्याच्या नादात सोलापूर येथील १४ वर्षीय किशोरवयीन मुलगा पुण्याच्या दिशेने जात होता. हे लक्षात येताच सोलापूर पोलिसांनी भिगवण पोलिसांना संपर्क साधून भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस एन. एम. राठोड यांनी तातडीने कार्यवाही केली. त्यामुळे भिगवण बसस्थानकात मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, असे असले तरी ‘ब्लू व्हेल’सारख्या जीवघेण्या मोबाईल गेमचे लोण आता ग्रामीण भागात पोहोचले आहे. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
सोलापूर येथील सुधीर भोसले हा १४ वर्षीय मुलगा सकाळच्या सुमारास सोलापूरहून पुण्याला जाणाºया बसमध्ये बसून पुण्याकडे जात असल्याची माहिती सोलापूर पोलिसांनी भिगवण पोलिसांना दिली. काही दिवसांपासून हा मुलगा परदेशातील ‘ब्लू व्हेल’ गेम खेळत असल्याचीही माहिती दिली. त्यामुळे भिगवण पोलिसांनी तातडीने कारवाई करीत बस स्थानकावर बस तपासून सुधीरला ताब्यात घेतले. तातडीने त्याच्या घरच्यांना याबाबतीत माहिती दिली. ग्रामीण भागात ब्लु व्हेलसारख्या अनेक आॅनलाइन गेम खेळल्या जात असून, ‘लुडो गेम’ तर मुले रात्र-रात्रभर खेळताना सापडत आहेत. सुधीरच्या बाबतीत वेळीच प्रकार लक्षात आल्याने पुढील आनर्थ टळला आहे.
ग्रामीण भागातही गेमचे भूत तरुणांच्या डोक्यात
भिगवणसारख्या ग्रामीण भागातही आॅनलाइन गेमचे भूत तरुणांच्या डोक्यावर बसले आहे. चौका-चौकांत तरुण कोपºयातील कट्ट्यावर बसून मुले लुडोसारखी गेम खेळत बसलेले असतात. त्यांच्यावर घरच्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, पोलीस प्रशासनाने ही सामाजिक जबाबदारी ओळखून मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.